2 वर्षांपूर्वी रविकांत कांबळे यांच्या घरी दोन पऱ्या आल्या...राशी आणि खुशी..पेशाने पत्रकार... आई, पत्नीसह घर भरलेलं... पण कुणाची तरी दृष्ट लागली आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं.
रविकांत यांच्या आई काल संध्याकाळी 5 वाजता आपल्या एका नातीला घेऊन सराफाकडे निघाल्या... त्या परतल्याच नाहीत. सराफाकडून परत येताना उषा कांबळे एका किराणा दुकानात थांबल्या होत्या. पण त्यानंतर त्या कुठे गेल्या, त्यांचं काय झालं, हे कळत नव्हतं. त्यामुळे रविकांत यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर सगळीकडे आजी आणि नातीचा शोध सुरु झाला. रात्रभराच्या शोधानंतर आज एक फोन आला आणि कांबळे कुटुंबावर आभाळ कोसळलं. आजीचा आणि दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नाल्यात सापडला.
वाद काहीही असो, पण या दोघींनी कुणाचं काय बिघडवलं होतं? रविकांत हे क्राईम रिपोर्टर असल्याने कुणी सूडबुद्धीने हे कृत्य केलं आहे का? असे अनेक प्रश्न पडले होते. पण उषा कांबळे या शेवटच्या ज्या किराणा दुकानात दिसल्या, त्या दुकान मालक गणेश साहूची चौकशी सुरु केली. कारण आजच सकाळी गणेशने आपली गाडी धुतल्याचं समोर आलं.
इतकंच नाही, तर त्याच्याच घरात रक्तांचे डाग आढळून आले. अखेर पोलिसी खाक्या दाखवला आणि गणेश साहूने हत्येची कबुली दिली. आर्थिक वादातून आपण या दोघींची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. अवघ्या काही रुपयांसाठी एक हसता खेळता परिवार अवघ्या काही तासांमध्ये उद्ध्वस्त झाला.