मुंबई: अधिवेशनात आंदोलनं, घोषणाबाजी, विधेयकं,प्रस्ताव या गोष्टी तुम्ही ऐकतंच असाल पण याही पलीकडे खुप काही गोष्टी घडत असतात. यामध्ये आमदार, नेत्यांचे पडद्यामागचे अनेक किस्से आहेत जे खुप गंमतीशीर आहेत.
कडक ड्रेसिंगची, कडक चर्चा
देवानंद कॅप, ब्लॅक टी शर्ट आणि ब्राऊन जॅकेट घालून अनिल देशमुखांनी अशी काय एन्ट्री घेतली की सगळेच चकित झाले. कारण नेहमीच गांधी टोपी घालून वावरणारे देशमुख आज एकदम हिरोच्या लूकमध्ये आले होते त्यामुळे आज चर्चा देशमुखांच्या कडक ड्रेसिंगची होती. काल अजित पवारांनी चहापानाला सूटबूटमध्ये एन्ट्री केली होती. पण आज दादांचा लूक बदलले होता. अजित पवार आज सफारीत आले होते तर अबु आझमी आणि प्रकाश सुर्वे यांनी सुद्धा सूट परिधान केला होता नेहमीच सफेद कपड्यांवर दिसणा-या नेत्यांना आज वेगळ्या लूक मध्ये पाहिल्यानंतर चर्चा तर रंगणारच.
मंत्रीपदावरून आमदारांमध्ये चिडवाचिडवी
“मंत्री आला बघा”, मंत्रीपदाच्या यादीत याचं नाव पक्कं, कुठलं मंत्रीपद घेणार इथेपर्यत आज महाविकास आधाडीच्या आमदारांमध्ये चर्चा रंगली. मंत्रिमंडळ विस्तार जवळ आला आहे. जुन्या आणि नविन आमदारांना मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे. मंत्री होण्याच्या काही आमदारांच्या इच्छा चेह-यावरच दिसत असतात तर काही गुपचुप गुपचुप लाॅबिंग करत असतात पण अशीच सगळी मंडळी एकत्र आली की फार मजा येते आज अशीच महत्वाकांशी मंडळी एकत्र आली आणि एकमेकांना चिडवताना दिसली.
भाजपच्या आंदोलनाची शिवसेनेनं घेतली मजा
“बोंबलायचं तेवढं आता पाच वर्ष बोंबला” असं म्हणत शिवसेनेच्या काही आमदारांनी भाजपच्या आंदोलनाची मजा घेतली. ज्याठिकणी भाजपचं आंदोलन सुरु होतं त्याच्या विरुद्ध दिशेला शिवसेनेचे काही आमदार एकत्र जमले होते. पाच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपनं नागपूर अधिवेशनाचा पहिला दिवस आंदोलनानं गाजवला. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपनं राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली त्याचवेळी भाजपवाल्यांचे घसे बसले की गप्प बसतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती त्यामुळे एकीकडे भाजप आंदोलनात व्यस्त असताना दुसरीकडे कोप-यात उभे राहुन सेनेचे आमदार मजा घेत होते.
दरेकरांना लाॅटरी कशी लागली?
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकरांना संधी मिळताच अनेकांना भुवया उंचावल्या कारण अखेरपर्यंत सुजितसिंग ठाकूर याचं नाव चर्चेत होतं. जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळत होतं असं असताना हि लाॅटरी दरेकरांना कशी लागली हा प्रश्न भाजपसह महाविकास आघाडींच्या नेत्यांना पडला आहे. दरेकर विरोधी पक्षनेते विराजमान झाल्यानंतर प्रकाश सुर्वे देखील चिंतेत दिसले कारण दरेकर आणि प्रकाश सुर्वे यांच्यातलं द्वंद सर्वांनाच माहित आहे. दोघेही एकाच मतदारसंघातले असल्यामुळे पुढे नाट्यमय घडामोडी घडताना दिसतील
संबंधित बातम्या :