पुणे : पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गात येणाऱ्या खेड-शिवापूर टोल नाक्याचा अडथळा आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे ते सातारा दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण झालं नाही तर खेड शिवापूर टोलनाका बंद करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरचा खेड शिवापूर टोलनाका... 2010 पासून इथे रस्त्यांची कामं सुरु झाली, जी अजूनही पूर्ण झालेली नाहीत. या महामार्गाची कामं 2013 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या कामांमुळे दोन तासांचा प्रवास सहा तासांवर गेला आहे. याविषीय आज जिल्हाधिकारी म्हणाले की, "खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत एक महिन्याचा वेळ दिला आहे. जर वेळेत काम झालं नाही, तर सरकारला फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव पाठवला जाईल. अनेक ठिकाणी कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. सर्व बाजू ऐकून टोल सुरु ठेवायचा की बंद करायचा याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल."
गेल्या काही वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रामुख्याने खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली, इतरही उपाय-योजना करण्यात आल्या आहेत. परंतु महामार्ग प्राधिकरणाकडून सर्विस रोडची कामं व्यवस्थित केलेली नाही. स्थानिकांना विचारात न घेता मार्ग तयार करण्यात आला. यामुळे बैलगाड्यांसह ट्रॅक्टर तसंच शेतीविषयक वाहनं आणि स्थानिक वाहनांना महामार्गावराशिवाय पर्याय नाही. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांना वारंवार नोटीस देण्यात आल्या आहेत. बैठका घेऊनही सर्विस रोड आणि त्याच्या उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
करारात असलेली वेळ पाळली गेली नाही. त्यामुळेच रस्त्याच्या देखभालीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेऊन पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी हा टोल नाका बंद करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याचा निर्णय घेऊन कंत्राटदारांना इशारा दिला आहे. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना थेट टोल बंद करण्याचे अधिकार नसतात. मात्र, त्यांनी दिलेल्या अहवालामुळे टोल बंद होऊ शकतो. त्यामुळे आता पुढच्या महिन्याभरात महामार्गाची कामं झाली नाही तर पुणे-सातारा महामार्गावरचा खेड शिवापूर टोलनाका बंद होणार हे नक्की.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर खेड शिवापूर टोलनाका बंद करण्याचा प्रस्ताव पाठवणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2019 05:18 PM (IST)
गेल्या काही वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रामुख्याने खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या कामांमुळे दोन तासांचा प्रवास सहा तासांवर गेला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -