वर्धा : मातृत्त्वाचा सन्मान करण्यासाठी सरकारकडून नेहमीच वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ खरंच गरजूंना मिळतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बिल भरायला पैसे नसल्याने रुग्णालयाने बाळ देण्यास नकार दिल्याचा आरोप एका दाम्पत्याने केला आहे.
मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील रोजमजुरी काम करणारं सिरसाम दाम्पत्य कामाच्या शोधात सध्या सेलू तालुक्यातील महाबळ येथे शेतात सालगडी म्हणून वास्तव्याला आहे. रेखा-सुखनंदन सिरसाम असं पती-पत्नीचं नाव आहे.
''पैसे नसल्यामुळे जेवणाचा डबा बंद''
रेखा यांना प्रसुतीसाठी 7 ऑगस्टला सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आलं. 8 ऑगस्टला त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र मुलाचं वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मागणीनुसार वेळोवेळी असे सहा हजार रुग्णालयात भरल्याचं सिरसाम दाम्पत्याकडून सांगण्यात आलं. मात्र आता बिलाची रक्कम न भरल्याने जेवणाचा डबा बंद केल्याचा आरोप रेखा यांनी केला आहे.
मुलाला दिवसभरात पाच ते सहा वेळा स्तनपान करणं गरजेचं आहे. त्यासाठी रेखा यांना पोषक आहार पुरवणं रुग्णालयाची कर्तव्य आहे. मात्र तसं न करता रुग्णालयाने पैसे नसल्यामुळे मिळणारं जेवणही बंद केल्याचा आरोप रेखा यांनी केला. रेखा यांना वर्ध्याच्या पवनसुत हनुमान सेवा ट्रस्टच्या मंडळींनी विचारपूस करत प्राथमिक गरजेपोटी मदत दिली आहे.
जवळ होते तेवढे पैसे जमा केले. मात्र आता उपचार सुरु असल्याने सतत पैसे मागितले जात आहेत. त्यामळे बाळाला रुग्णालयात सोडून पैसे मागण्यासाठी रेखा थेट महाबळा येथे पतीजवळ शेतात निघून आल्या. जवळ पैसे नसल्याने सिरसाम दाम्पत्याने रुग्णालयातून सुट्टी मागितली. मात्र पैसे द्या आणि बाळ घेऊन जा, असं रुग्णालयाने सांगितल्याचा आरोप सिरसाम दाम्पत्याने केला आहे.
कुठे आहेत सरकारी योजना?
सिरसाम दाम्पत्य बीपीएलधारक आहे. बीपीएलधारक असल्याने रेखा यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित होतं. रुग्णालयाने पैशांसाठी मातेची अडवणूक करणं बेकायदेशीर आहे. सिरसाम दाम्पत्याने भरलेले पैसे त्यांना परत मिळतील. रुग्णालयावर चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं.
रुग्णालयाने आरोप फेटाळले
दरम्यान सेवाग्राम रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. बाळ जन्मलं तेव्हापासूनच ते अशक्त आहे. वजन कमी असल्याने बाळावर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयात पैशांअभावी सेवा बंद केली जात नाही, असा दावा सेवाग्राम रुग्णालयाने केला आहे.
सिरसाम दाम्पत्य परप्रांतीय असून महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांची पैशांअभावी अडवणूक होणं ही दुर्दैवी बाब आहे. मातृत्त्व सन्मानासाठी सरकारने कितीही योजना आणल्या, पण त्या गरजूंपर्यंत पोहोचतच नसतील, तर या योजना केवळ कागदोपत्रीच असल्याचं म्हणावं लागेल.
बिल द्यायला पैसे नाही, रुग्णालयाचा बाळ देण्यास नकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2017 10:20 PM (IST)
प्रसुतीनंतर दाम्पत्याने जवळ होते तेवढे पैसे रुग्णालयात जमा केले. मात्र सुट्टी घ्यायची तेव्हा पैसे नसल्याने रुग्णालयाने बाळ देण्यास नकार दिल्याचा आरोप दाम्पत्याने केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -