Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा सुरु आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कहर आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 26 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.  


23 मे पासून दक्षिण महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळीची तीव्रता अधिक


माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक 23 मे पासून तर दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या 8 जिल्ह्यात अवकाळीची तीव्रता अधिक जाणवणार आहे.  महाराष्ट्रात 27 मे पासून पूर्व-मोसमी गडगडाटीचा वळीव स्वरुपाच्या पावसाची शक्यताही आहे.    


मुंबईसह कोकण, खान्देश, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता


मे महिन्याच्या मासिक अंदाजाप्रमाणे टोकाचे कमाल तापमान व सरासरीपेक्षा अधिकच्या उष्णतेच्या लाटेसंबंधीचे अपूर्ण भाकीत 19 मे पासून आठवडाभर म्हणजे 26 मे पर्यंत उष्णतेच्या आघाताने पूर्ण होईल असे वाटते. मुंबईसह कोकण, खान्देश, मराठवाड्यात उष्णतेची लाट सदृश किंवा दमटयुक्त उष्णतेची स्थिती 19 ते 26 मे पर्यंतच्या आठवड्यात जाणवेल, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 


लवकरच होणार मान्सूनचे आगमन 


अंदमान निकोबार व केरळात मान्सून पोहोचण्यासाठीची आवश्यक स्थिती तयार झालीय. पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी अगोदरच सुरु झाली आहे. मान्सून आगमनासाठी 10 मे पासूनच पूरक गोष्टी घडत आहेत.  त्यामुळं मान्सून वेळेच्या आधीच केरळात पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी


नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाबतची माहिती जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, जरी मान्सून या भागात दाखल झाला असला तरी केरळमध्ये मान्सून 31 मे ते 3 जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सरासरीपेक्षा अधिक मान्सून होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी पावसानं चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळं यावर्षी राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.  


महत्वाच्या बातम्या:


मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती