मुंबई : देशभरात स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना मुंबई आणि महाराष्ट्रात मुलींची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये वाढली आहे. संपूर्ण देशासाठी कौतुकास्पद बाब आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये हे आकडे समोर आले आहेत.


 


नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 (NHFS)  2015-16 नुसार महाराष्ट्रात मुलींच्या लिंग गुणोत्तराने 1,000 चा आकडा पार केला आहे. सामान्यत: 1,000 मुलांमागे 950 मुलींचे प्रमाण आहे, असे मानले जाते. तर मुंबईत लिंग गुणोत्तर 1,033 असल्याचे या आकडेवारीवरुन पुढे आलं आहे.



मुंबईसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, भंडारा आणि अकोला या सर्व प्रमुख शहरांमध्ये या गुणोत्तराने 1,000 चा आकडा पार केला आहे. केवळ कोल्हापूर आणि पुण्याचा काही भाग वगळता राज्यातील ग्रामीण भागातही मुलींचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे असं प्रमाण केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्येच दिसून येतं.


 


मुलींचं जन्मदर वाढण्याच्या प्रमाणात वर्धा जिल्हा राज्यात सर्वात पुढे आहे. वर्ध्याच्या शहरी भागात हे गुणोत्तर 1,266 तर ग्रामीण भागात 1,377 एवढे आहे. अकोला, औरंगाबाद आणि पुण्यात अनुक्रमे 1,068, 1,067, 1,066 लिंग गुणोत्तर आहे. या जन्मदराच्या आकड्यावरुन लोकांचे बदलते विचार दिसत आहे.



ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात 747, धुळ्यात 805, जळगावमध्ये 819 आणि कोल्हापूरमध्ये 831 एवढे मुलींचे प्रमाण आहे.


 


नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत केला जाणारा हा सर्व्हे आहे. महाराष्ट्राच्या 27,000 घरांमध्ये जाऊन हा सर्व्हे नोंदवण्यात आला.  तसेच जिल्हा पातळीवर 700-800 घरांमध्ये सर्वेक्षण करून नमुने गोळा केले होते. यावरुन राज्यातील लोकांची बदलती मानसिकता समोर आली.