मुंबई : वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. झाकीर नाईक अनुयायांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दहशतवादाच्या विविध आरोपांखाली अटकेत असलेले तब्बल 55 जण झाकीर नाईकमुळे प्रेरित झाल्याचा खुलासा झाला आहे. झाकीर नाईकवर कोणता गुन्हा दाखल करता येईल का याची माहिती घेताना गृह मंत्रालयाला 55 दहशतवाद्यांशी त्याचा संबंध दिसून आला आहे.


 


झाकीर नाईकच्या भाषणांमुळे प्रेरित


सुत्रांच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत दहशतवादाच्या आरोपातील 55 जण झाकीर नाईकच्या भाषणांमुळे प्रेरित होते. हे सर्व आरोपी सिमी, लश्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन आणि आयसिस इत्यादी संघटनांसाठी काम करताना पकडले गेले होते. यात 3 पोलिसांचाही समावेश आहे.



झाकीर नाईकच्या चौकशीच्या व्याप्तीत वाढ


दरम्यान झाकीर नाईकच्या चौकशीची व्याप्तीही वाढली आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असून कोल्हापूरमध्ये एक खटला प्रलंबित आहे. या नव्या खुलाशानंतर तपास यंत्रणांनी सखोल चौकशी सुरु केली आहे.



एनआयएकडून काही इस्लामिक धर्मप्रचारकांच्या नावाचा खुलासा


एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तब्बल 14 इस्लामिक धर्मप्रचारकांचा उल्लेख केला आहे, जे आपल्या भाषणातून दहशतवादाला पोषक वातावरण निर्माण करत आहेत. हे सर्व प्रचारक अमेरिका, इंग्लंड, कॅनडा ऑस्ट्रलिया आणि झिम्बाब्वे या देशांतील आहेत.


 


यापैकी बऱ्याच जणांनी आयसिस आणि अल-कायदाच्या कामांचा इन्कार केला आहे. आयएसचा समर्थक असल्याच्या संशयातून अटकेत असलेल्या मोहम्मद फरहान शेख या तरुणाने तो बऱ्याच धर्मगुरुंमुळे प्रेरित झाल्याचे एनआयए अर्थातच राष्ट्रीय तपास यंत्रणेला सांगितलं आहे.