नांदेड : नांदेड इथले रहिवासी असणारे आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख असणारे दिग्गज लावणी, भरतनाट्यम आणि कथ्थक कलावंत डॉ. भरत जेठवाणी यांनी लिंग परिर्वतन करुन पुरुषी देहाला मूठमाती देत स्त्री देहाचा स्वीकार केला आहे. भरत यांनी लिंग परिवर्तन करत स्त्रीत्वाचा स्वीकार केला आहे. आता त्या सान्वी जेठवाणी या नावाने ओळखल्या जातील. नांदेड इथल्या बाफना परिसरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या एका सिंधी व्यावसायिक कुंटुंबात जन्माला आलेले भरत जगदीश जेठवाणी हे जन्माने पुरुष होते. भरत यांचे वडील जगदीश जेठवाणी हे नांदेड येथील प्रसिद्ध कपडा व्यावसायिक म्हणून सुपरिचित आहेत. भरत जगदीश जेठवाणी अर्थात सान्वी या नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात एक लावणी, कथ्थक, भरतनाट्यम नर्तक कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तर राज्यासह देशभरातील विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांनी आपला नृत्याविष्कार सादर करुन अनेक परितोषिकांवर आपले नाव कोरलेले आहे.
भरत जगदीश जेठवाणी यांचा भरत ते सान्वी बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणावा तसा साधा, सोपा आणि सुकर नव्हता. भरत जगदीश जेठवाणी मूळचे नांदेडचे रहिवाशी. त्यांनी महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणीत व्यवस्थापन शास्त्रात Phd अर्थात डॉक्टरेट केलं आहे. तर MA Phd, MBA, BCA, डिप्लोमा ऑफ फोल्क आर्टस् असे त्यांचे भरत अर्थात सान्वी यांचे शिक्षण झाले आहे. जन्माने पुरुष असणाऱ्या भरत यांचा सान्वी पर्यंतचा प्रवास खूप खडतर आणि तेवढाच अवघड राहिला आहे. जन्माने पुरुष असणाऱ्या भरत यांना आपल्या भावना स्त्रीत्वाच्या असल्याच्या माहित झाल्यानंतर त्यांना पहिला सामना करावा लागला तो आपल्या कुटुंबीयांचा, नातेवाईक मित्र परिवाराचा. प्रामुख्याने भारतीय संस्कृतीत मुलगा, मुलगी वयात आले की पालक पहिल्यांदा विचार करतात ते त्यांच्या लग्नाचा. भरत हे वयात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना लग्नाची विचारणा केली पण भरत काही केल्या तयार होत नव्हते. दरम्यान या सर्व गोष्टीवर उपाय म्हणून भरत यांनी आपल्यामधील स्त्रीत्वाची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. पण हे कळताच पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेल्या आई-वडिलांनी ही गोष्ट समजून न घेता त्यांनाच दोष देण्यास सुरुवात केली. आपल्याला मुलाला मुलगी म्हणून जगायचंय असे समजल्यावर भरतच्या वडिलांनी त्यांच्याशी बोलणे बंद केले. तर तू घर सोडून जा असेही सांगितले. दरम्यान आई ,वडील, नातेवाईक यांनी त्याच्याशी अबोला धरत वाळीत टाकले तर मित्र मंडळी, समाज या सर्वांनी त्याला हिजडा, छक्का, किन्नर असे म्हणून हिणवले. तर जन्मदाते वडीलही अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्याशी बोलले नाहीत, अबोला धरला. तर मुलाच्या अशा वागण्यानेच वडिलांचा मृत्यू झाल्याचे दूषणे आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी लावले. पण शेवटी आईला आपल्या मुलाच्या भावना कळल्या आणि त्याला पाठिंबा दिला, बळ दिले. त्यामुळे आपल्या स्त्रीत्वाला आकार देण्याची जी जिद्द भरत यांनी केली होती, ती मात्र त्यांनी सोडली नाही.
दरम्यान आपण स्त्रीच आहोत, असा स्वीकार केलेल्या भरत यांना कुमार वयात असताना एका तरुणावर आपले प्रेम होते, असा खुलासाही त्यांनी केला. तर स्त्री सुलभ भावना घेऊन चालताना त्यांच्यावर अनेक बाका प्रसंगही उद्भवल्याचा अनुभव भरत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला. ज्यात आपण लावणी कलावंत म्हणून वावरताना आपल्यावर राजकीय लोकांकडून, निकटवर्तीयांकडून बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला गेल्याची माहिती त्यांनी दिली.
आपण पुरुष असूनही आपल्या भावना स्त्रीत्वाच्या आहेत हे पहिल्यांदा वयाच्या चौदाव्या वर्षात लक्षात आले. तर आपलं शरीर जरी पुरुषाच असलं तरी आपल्या भावना या पूर्णपणे स्त्रीच्या असल्याची जाणीव भरत यांना स्वतः च्या पेहराव करण्यावरुन, वागण्यावरुन, स्त्रीऐवजी पुरुषांविषयी असणारे त्यांचे आकर्षण यावरुन वारंवार होत होती. वैज्ञानिक भाषेत सांगितले तर पुरुष अथवा स्त्री म्हणून जन्मास आलेल्या व्यक्तीस जर स्त्रियांप्रमाणे अथवा पुरुषांप्रमाणे वागू वाटत असेल त्यास जेंडर डिस्फोरिया असे म्हणतात. लहानपणापासून मनात असलेल्या एका स्त्रीला आता समाजात देखील स्थान मिळेल. समाजाने आणि मित्रमंडळीने सर्वांनी मला प्रोत्साहन देऊन इथपर्यंत आणले आहे, पुढेही मला मदत करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.भरत जेठवानी यांना भरत ते सान्वीपर्यंतच्या प्रवासाला मदतगार असणारे प्रमुख म्हणजे नांदेड येथील प्लास्टिक सर्जन डॉ. मनीष देशपांडे आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. परमेश्वर बोले हे होते. सुरुवातीच्या काळात लिंग परिवर्तनाची किचकट आणि खर्चिक शस्त्रक्रिया ही भारता बाहेर परदेशात होत होती. परंतु डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने भरत यांची ही शस्त्रक्रिया दिल्ली इथल्या डॉ. नरेंद्र कौशिक यांच्या ऑलमॅक या रुग्णालयात यशस्वी रित्या पार पडली. त्यामुळे जेठवाणी हे नांदेडचे पहिले पुरुष लिंग परिवर्तीत महिला ठरले आहेत. तर लिंग परिवर्तित होऊन भरतची सान्वी झालेल्या जेठवाणी यांनी लग्न करुन संसारसुख उपभोगण्याची इच्छा असल्याचेही बोलून दाखवली. मला जरी स्वतःचे मूल झाले नाही तरी अनाथ मुलास दत्तक घेऊन सिंधूताई सपकाळ यांच्या प्रमाणे अनाथांची आई होण्याची इच्छाही व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून लावणीत वेगवेगळे प्रयोग करुन पारंपारिक लावणीचा प्रसार भारतात आणि विदेशात डॉ. भरत यांनी केला आहे. लावणीसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील डॉ भरत यांना प्राप्त झाले आहेत. त्यात प्रामुख्याने लावणी सम्राट, नृत्य शिरोमणी, भारतीय नृत्य, रत्न आदीचा समावेश आहे. लावणीवरच त्यांनी पीएचडी देखील केलेली आहे. जेठवाणी यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले असून नांदेडला नावलौकिक मिळवून दिले आहे. हे कार्य आयुष्यभर सुरु राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच समाजाचा इतर लिंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळे समाज त्यांना आपल्यातला समजत नाहीत. तर हा भेदभाव मिटवून टाकायचा आहे आणि माणसाची ओळख माणूस म्हणून राहिली पाहिजे यासाठी देखील कार्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.