अहमदनगर : पाट्या म्हटलं की पुण्याची आठवण येते. पुणेरी पाट्या या राज्यभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, अहमदनगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. 'पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही,' अशी पाटी पंपावर लिहिण्यात आली आहे. या पाटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. अहमदनगरमध्ये आज पेट्रोलचा दर 120 रुपये प्रति लिटर इतका आहे.


पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पंपावर दररोज वेगवेगळे बोर्ड लिहितात. कधी सुविचार तर कधी चारोळी ते लिहितात. यातून पंपावर येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन तर होतेच, पण कधी कधी त्यांच्या जीवनाला एखाद्या सुविचाराने कलाटणी मिळते, असं बोरा यांनी म्हटलं आहे. 




दरम्यान, देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलने कधीच शंभरी पार केली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे. देशात सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्‍लेयरमध्ये विकलं जात आहे. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही झालेला आहे.
 
6 एप्रिलपासून दरवाढ नाही पण...
भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे.