Public Works Department : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली आहेत. त्यामुळं कंत्राटदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याच्या विविध भागात त्यांच्याकडून आंदोलने सुरु आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Government Public Works) यवतमाळ, पुसद आणि पांढरकवडा विभागांतर्गत विविध विकासात्मक कामांची 400 कोटी रुपयांची देयके मागील दोन वर्षापासून थकीत आहेत. त्यामुळं  कंत्राटदार कल्याण संघटनेने तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. कंत्राटदारांना प्रत्येक तिमाहीत 10 ते 20 टक्के असा तुटपुंजा निधी वितरीत करण्यात येतो. त्यामुळं कंत्राटदार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं दोन महिन्यात पूर्ण देयके न मिळाल्यास सर्व शासकिय कामे बंद करु असा ईशारा कंत्राटदारांनी दिला आहे. 


धाराशिवमध्ये  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण 


धाराशिव शहरात बीड आणि धाराशिव कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पायी रॅली व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या शासकीय विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचे देयक मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.  दर दोन ते तीन महिन्याला 10 ते 20 टक्के निधी शासन देत असल्याने ठेकेदार अडचणीत आले असून या प्रकरणात तात्काळ कार्यवाही करुन निधी वितरीत करण्याच्या मागणीसाठी आज धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. 


दोन वर्षांपासून कामांची बिले थकली


दरम्यान दोन वर्षांपासून कामांची बिले थकली असल्याने अनेकांच्या बँकेच्या कर्जाची हफ्ते थकले आहेत, त्याचे व्याज वाढत आहे, कामगारांचे पगार देणे कठीण झाले आहे, यंत्रणेची इंधन बिले, पुरवठादारांचे देणे असे अनेकांचे देणे थकले आहे. यामुळे कंत्राटदारांसह हे सर्व घटक अडचणीत सापडले आहेत. यासाठी आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना निवेदने देऊन झाली. निदर्शने करुन झाली. राज्याच्या विविध भागात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून थकीत बिले मिळाली नाहीत, तर त्यामुळे कंत्राटदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, सर्व कंत्राटदारांची बिले वेळेवर मिळालीच पाहिजे', अशा प्रकारच्या घोषणा यावेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात येत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Dhule News : दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली, शासकीय कंत्राटदारांचे लाक्षणिक साखळी उपोषण