सांगली : सांगली जिल्हा कारागृहाच्या कोरोना सेंटरमधून पलायन केलेल्या दोघा फरारी कैद्यांना अखेर जेरबंद करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. राजू कोळी आणि रोहित जगदाळे असे अटक केलेल्या फरारी कैद्यांची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे हे दोघेही कोरोना बाधित होते आणि त्यांनी 27 सप्टेंबर रोजी सांगलीतील कारागृहाच्या कोरोना विलगीकरण सेंटर मधून पलायन केलं होतं.


सांगली शहर पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असणाऱ्या राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांना दरोड्याचा गुन्हा मध्ये 17 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सांगलीच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली होती. दरम्यान कारागृह प्रशासनाकडून त्यांची 19 सप्टेंबर रोजी दोघांचे कोरोना टेस्ट करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सांगली कारागृहाकडून शहरातल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते.


दरम्यान 27 सप्टेंबर रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी त्यांना ठेवण्यात आलेल्या खोलीतील खिडकीचे गज कापून पलायन केले होते. या घटनेनंतर पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. सांगली पोलिसांकडून गेल्या 10 दिवसांपासून फरारी असलेल्या राजू कोळी आणि रोहित जगदाळे यांचा शोध घेण्यात येत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलिसांची 5 पथके तैनात करून जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात ही पथके रवाना केली होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यातील राजू कोळी याला कराड येथून तर रोहित जगदाळे याला सांगली शहर पोलिसांनी सांगली मधून अटक केली आहे.