ठाणे : पैशाच्या देण्या घेण्यावरून ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचीच हत्या केल्याची घटना कळवा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीतून खाडीत फेकणाऱ्या त्रिकुटाला कळवा पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणात कुठलेही धागेदोरे नसताना टेलरमार्क वरून अवघ्या 12 तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत त्यामुळे कळवा पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 


1 डिसेंबर रोजी कळवा खाडीत 30 ते 40 वर्षीय पुरुष इसमाचा मृतदेह असल्याची माहिती ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असता त्या अनोळखी इसमाची कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खाडीच्या वाहत्या पाण्यात टाकल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी कळवा पोलीस स्टेशनमध्ये हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या मृतदेहावर अनेक जखमा आणि त्याचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळले. मात्र इतर कोणताही पुरावा त्याठिकाणी पोलिसांना सापडला नाही. तेव्हा मृतकाच्या शर्टच्या "सुंदर टेलर्स" या टेलरमार्क वरून मृतकाची ओळख पटविण्याच्या कामात पोलीस जुंपले आणि त्यांना मृतकाची ओळख पटली. 


मृतकाचे नाव शेख मोहंमद आसीफ असून तो शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई इथे राहणारा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस पथकाने गोवंडी येथे जाऊन तपास केल्यानंतर या प्रकरणात समाविष्ट असलेले आरोपी निशामुग्रीन इस्लाम मुझोन शेख या मुख्य आरोपीसह मिर्झा अली नवाब आणि मोहम्मद इरफान खान यांना अटक केली. निशामुग्रीन याच्या बहिणीला मृतक शेख मोहम्मद आसिफ याने पैशाच्या घेण्यादेण्या वरून झालेल्या वादात जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याच रागातून निशामुग्रीनने पैसे देण्यासाठी शेख याला बोलावून लाकडी बांबु तसेच कठीण हत्याराने गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले.  त्याचा पुरावा मिळू नये म्हणून त्याचे हात आणि पाय बांधून गोणीत भरून कळवा खाडीत फेकल्याचे तिन्ही आरोपींनी कबूल केले. हा संपूर्ण तपास केवळ 12 तासात कळवा पोलिसांनी केला. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :