उल्हासनगर : माणसाचा सर्वात जवळचा मित्र म्हणून कुत्रा यालाच ओळखलं जातं. पण अनेकदा आपल्या याच जवळच्या मित्रासोबत माणसांचं वागणं अत्यंत चूकीचं असतं. कित्येकदा पाळी कुत्र्यांसोबतही वाईट वागणूक केली जाते, तर भटक्या कुत्र्यांचा विचारच करायला नको. त्यात अशा कुत्र्यांसाठी झटणाऱ्या प्राणीमित्रांनाही अनेकदा चूकीची वागणूक दिली जाते. दरम्यान अशी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. काही मद्यपींनी आधी भटक्या कुत्र्यांना मारहाण केली, ज्यानंतर त्यांना जाब विचारणाऱ्यां दोन प्राणीमित्रांनाही मद्यपींकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई देखील केली आहे.


नेमकं काय घडलं?


उल्हासनगरमधील प्राणीमित्र कैलास कल्याणी आणि राज चोटवानी हे दररोज रात्री शहरातील भटक्या कुत्र्यांना खाऊ देण्यासाठी फिरत असतात. 27 नोव्हेंबरला रात्री 1 वाजण्याच्या सुमारासही हे दोघे कॅम्प पाच स्वामी शांती प्रकाश शाळेजवळील भटक्या कुत्र्यांना खाऊ देण्यासाठी गेले होते. यावेळी त्याठिकाणी पाच ते सहा जणांची टोळी दारू पीत बसली होती. त्यातील एका तरुणाने तेथील भटक्या कुत्र्याला नारळ मारून फेकून मारला. ज्यानंतर राज आणि कैलास यांनी लगेचच त्याला जाब विचारला. ज्यामुळे त्या माथेफिरुंना राग आला आणि त्यांनी कैलास आणि राज यांनाही बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या माथेफिरुंनी कमरेचा पट्टा आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचंही समोर आलं आहे. 


पोलिसांनी गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या


दरम्यान घटना घडलेल्या ठिकाणी सुदैवाने सीसीटीव्ही कॅमेरा लावला असल्याने संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ज्यामुळे पोलिसांना तपासादरम्यान मदत झाली. ज्यामुळे हिललाईन पोलीस ठाण्यात संबधित टोळी विरुद्ध कलम 324, प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर आरोपींना हिललाईन पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha