Mumbai Crime News : Kalachowki Kidnapping Case : काही दिवसांपूर्वी मुंबईतील काळाचौकी परिसरातून तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण झालं होतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्यापही बाळाचा शोध लागलेला नाही. अशातच पोलिसांकडून अपहरण करणाऱ्या महिलेचं स्केच जारी करण्यात आलं आहे. ही महिला कुठे दिसल्यास पोलिसांना कळवा, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून (Kalachowki Police Station) करण्यात आलं आहे. एबीपी माझाही आवाहन करत आहे की, सदर स्केचमधील महिला कुठेही दिसली तरी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून त्यासंदर्भात माहिती द्यावी. बाळाचं अपहरण करणार्या महिलेचा वय साधारण ते 30 ते 35 वर्ष असून ती आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेचं स्केच तयार केलं आहे. सध्या पोलीस या महिलेचा आणि बाळाचा शोध घेत आहेत.
जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं. ही धक्कादायक घटना मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. सदर महिला काळाचौकी परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तिचं स्केच जारी केलं आहे.
काळाचौकी परिसरात राहणाऱ्या सपना मगदूम या आपल्या घरी एकट्याच असताना, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली. जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचं सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला. सपना मगदूम यांची तीन महिने पंधरा दिवसांची मुलगी वेदा मगदूम ही पलंगावर झोपली होती. आरोपी महिलेला देण्यासाठी घरात असलेला जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम आतल्या खोलीत जात होत्या. तेवढ्यात आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिनं बेशुद्ध करण्याचं औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं. पलंगावर झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली.
सपना मगदूम या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांची चिमुकली वेदा पलंगावर नव्हती आणि जी महिला भांडी विकण्यासाठी आली होती. तिने आपल्या बाळाचं अपहरण केल्याचं त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा