ठाणे : सुलभ प्रसुतीसाठी जनावरांसाठी वापरलं जाणारं औषध माणसांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या पाचपाखाडी भागात उघडकीस आला आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणार्‍या ऑक्सिटोसिन या औषधाची बिलाशिवाय खरेदी करुन त्याची विक्री मानवी रुग्णांसाठी केली जात असल्याचं समोर आलं आहे.


ठाण्यातील आधार रुग्णालयात 19 सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी या औषधाची विक्री झाल्याची माहिती आहे.

याप्रकरणी लाईफकेअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे, फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि औषध वितरक कंपनी मेसिन रेमिडीज इंडिया यांच्याविरोधात नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

झाडाझडतीत ऑक्सिटोसिन इंजेक्शन आढळलं!
अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी 24 ऑक्टोबर रोजी या मेडिकलची तपासणी केली. या तपासणीत प्राण्यांसाठी वापरलं जाणारं मेसिन रेमिडीज इंडिया कंपनीचं ऑक्सिटोसिन इंजेक्शन आढळलं. महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांसाठी वापरायचं असा उल्लेख असतानाही या औषधाची विक्री आधार रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी करण्यात आली.

ऑक्सिटोसिनचा वापर कशासाठी?
जनावरांनी दूध जास्त द्यावं यासाठी हे औषध वापरलं जातं. परंतु हे इंजेक्शन महिलांच्या प्रसुतीसाठी बेकायदेशीररीत्या वापरलं जात आहे. या इंजेक्शनमुळे महिलेला कळा कमी येतात आणि प्रसुती लवकर होते, असं म्हटलं जातं.

दिशाभूल केल्याने कंपनीवरही गुन्हा
या औषधाचं उत्पादन नवी दल्लीतील मेसिन रेमिडीज इंडिया कंपनीत करण्यात आली आहे. लाईफकेअर मेडिकोने हे इंजेक्शन ठाण्याच्या श्री जैन फार्मामधून खरेदी केलं होतं. तर त्यांनी हे औषध कामोठ्याच्या युनायटेड फार्मामधून विकत घेतलं होतं. हे औषध जनावरांसाठी असल्याचा स्पष्ट उल्लेख बाटलीवर आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घ्यावं, अशीही सूचना दिली आहे. त्यामुळे कंपनीने गोंधळ निर्माण करुन  दिशाभूल केल्याने, कंपनीचे संचालक तसंच इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.