सातारा : महावितरणच्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र करुन महावितरणच्याच कार्यालयात कोंडलं आहे. त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी दुपारी 3 वाजल्यापासून या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलंय. सातारा जिल्ह्यातील ही घटना आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड ओगलेवाडी उपविभागीय वीज वितरण कार्यालयात ही घटना घडली. वीज वितरणच्या 2 कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ कराड ओगलेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात 10 अधिकाऱ्यांना कोंडण्यात आलं.
दोन कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. निगडी येथे वायरमन धोंडीराम गायकवाड यांचा पोलवरुन पडून मृत्यु झाला होता. त्याला जबाबदार म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन लाईनमनवर ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता.
मात्र जोपर्यंत या दोन कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार नाहीत, तोपर्यंत या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.