ठाणे: ठाण्यात नागरिक मालमत्ता कर भरत नाहीत म्हणून महापालिकेने अजब उपाय काढला आहे. ज्यांनी मालमत्ता कर भरला नाही, अशा थकबाकीदारांची नावं बॅनरवर छापण्यात आली आहेत. ही बॅनर त्यांच्या सोसायटीच्या बाहेर, त्यांचा विभागात, चौकात लावण्यात आले आहेत.

यासोबत काही नागरिकांच्या घरी, कार्यालयवर बँड बाजा घेऊन पालिका अधिकारी पोहोचत आहेत.

ठाण्यात एकूण 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी घराचे किंवा मालमत्तेचे एकूण 7 कोटी रुपये थकवले  आहेत. ती वसूल करण्यासाठी अनेक नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही जे लोक मालमत्ता कर भरत नाहीत, अशा लोकांची नावं या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत.



मालमत्ता कर

मुंबईतील 700 चौरस फुटांच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याच्या हालचाली सुरु असताना, ठाण्यात नागरिकांना कधी दिलासा मिळणार असा सवाल आता केला जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीत ठाणे आणि मुंबई अशी दोन्ही शहरातील नागरिकांच्या 500 चौ फुटांच्या घराचा मालमत्ता कर रद्द करु असे वचन शिवसेनेने दिले होते. मात्र यबाबतीत मुंबईमध्ये शिवसेनेचा जास्त जीव असल्याचे दिसून येतेय. कारण एकीकडे मुंबईत 700 चौ फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली असताना, ठाण्यासाठी मात्र सध्या काहीही नाही.

शिवसेना नेते ठाण्याला विसरले की काय असा प्रश्न निर्माण होतोय. ठाणे हा सेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाण्यात देखील 700 चौ फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द व्हावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

ठाण्यातील भाजप गट नेते मिलिंद पाटणकर यांनी तसा प्रश्न उपस्थित करत, शिवसेनेला वचननाम्याची आठवण करुन दिली. तर सेनेचे सभागृह नेते, नरेश म्हस्के यांनी, ठाण्यात देखील मालमत्ता कर लवकरच रद्द केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

दुसरीकडे ठाण्यातील सामान्य नागरिक पालिकेच्या बॅनरवाल्या धोराणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

‘सर्व महापालिका क्षेत्रातील 700 स्के.फूटापर्यंतच्या घरांचा कर रद्द करा’

मुंबईतील 500 फूटापर्यंतची घरं टॅक्स फ्री, पालिकेत ठराव एकमतानं मंजूर