औरंगाबाद : परवा ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग गेले आणि फेसबुक, व्हॉट्सअॅपवर त्यांच्या कोट्स आणि विज्ञानप्रेमाच्या मेसेजचा अक्षरशः पूर आला. मात्र आपलं हे विज्ञानप्रेम किती बेगडी आहे, याचा प्रत्यय सलग तीन दिवस महाराष्ट्र घेत आहे.


पुण्यात एका डॉक्टरनं रुग्णावर चक्क मांत्रिकाकडून उपचार केले. पिंपरीतील नाट्यगृहात रात्री प्रयोग होत नाहीत, का तर म्हणे तिथं भूत आहे, म्हणून त्यावर मांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्र करुन घेण्यात आलं. आता औरंगाबादच्या चौंढाळा गावात चक्क लग्न लागत नाही. त्यामुळे एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं तर त्यांना थेट गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं.



औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड पैठण रोडवर चौंढाळा नावाचं गाव. 700 लोकवस्तीच्या गावात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. ते माहूरच्या देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. देवीवरील श्रद्धेपोटी किंवा भीतीमुळे शेकडो वर्षांपासून अनेक प्रथा इथे पाळल्या जातात.

गावातील पोराचं किंवा पोरीचं लग्न ठरलं, तर गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं. लग्न जमलेल्या मुला-मुलींची लग्नं एक तर परगावी केली जातात किंवा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवेजवळील मारोतीच्या मंदिरात.

रेणुका देवी अविवाहित राहिली आणि तिचा आदर करण्यासाठी, किंवा तिचा कोप होऊ नये म्हणून या गावात आजही लग्न लावली जात नाहीत. हे गाव ही प्रथा गेल्या हजारो वर्षांपासून सांभाळत आलं आहे.



गावात दुमजली घरही कुणी बांधत नाही. कहर म्हणजे गावकरी जमिनीवरच झोपतात. गावात कुणाच्याही घरात बाज, कॉट किंवा पलंग नाही. बैलांना शिंगोट्या किंवा झूलही घातली जात नाही.

विज्ञानाच्या युगात महाराष्ट्रातील या अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या गावांचं काय करायचं? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
संबंधित बातम्या :

दीनानाथ रुग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलावलं, महिलेचा मृत्यू

पिंपरीत भुताची अफवा, यूपीतील मांत्रिकाला पाचारण

पुण्यात मांत्रिकाकडून महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा