मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024) तयारी जोरदार सुरु करण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाची महिला आघाडी देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येतेय. पहिल्यांदाच रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली 'स्त्री शक्ती संवाद' यात्रा आयोजित करण्यात आलीये. मंगळवार 16 जानेवारी रोजी विदर्भापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यामध्ये विदर्भातील महिलांशी संवाद साधला जाईल. 


पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी,राजूल पटेल, शितल देवरुखकर आणि रंजना नेवाळकर संपूर्ण विदर्भातील विधानसभेचा सखोल आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाची स्त्रीशक्ती संवाद यात्रा विदर्भातून सुरू होणार आहे. 


आंगणवाडी सेविकांशी संवाद साधला जाणार


राज्यात सध्या अंगणावाडी सेविकांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिला आघाडीकडून महिला बचत गट, अंगणवाडी सेविका  आणि इतर महिलांशी संवाद संबंधित विषयांवर भाष्य  या संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती, यवतमाळ वाशिम, रामटेक लोकसभा मतदारसंघात या महिला आघाडीकडून दौरा केला जाईल. 


ठाकरे गटाकडून महा पत्रकार परिषदेचं आयोजन 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार 16 जानेवारी रोजी महा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे 'जनता न्यायालय' असेल. 'सत्य ऐकून विचार करा!' असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय. ही पत्रकार परिषद नेमकी आयोजित करण्याची वेळ का आली आहे? या पत्रकार परिषद असे  कोणते मोठे गौप्यस्फोट  जाणार? पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सोबत नेमकं कोण असणार? हे प्रश्न सध्या उपस्थित केले जातायत. 


या पत्रकार परिषदेत नेमकं काय होणार?


या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यत्व करुन विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित करण्यात येतील. त्याचप्रमाणे 2018 साली शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून समोर ठेवली जाईल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडे देखील या सगळ्याची प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे दिले जातील. 


हेही वाचा : 


Uddhav Thackeray : उद्या उद्धव ठाकरेंची 'महा पत्रकार परिषद' , विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट मोठे गौप्यस्फोट करणार?