उस्मानाबाद : ठाकरे सरकारने तब्बल 19 सहकारी साखर कारखान्यांवर भाजपने नियुक्त केलेले प्रशासक आणि शासन नियुक्त संचालक हटवले आहेत. साखर आयुक्तांना सरकारचे संबंधित साखर कारखान्यांवरील सर्व प्रशासकीय संचालक बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा बॅंका, बाजार समित्यांच्या, साखर कारखान्यांच्या सोसायट्यांवरील सदस्यदेखील हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गेल्या काही दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने राज्यातील सहकार क्षेत्र स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं. परंतु 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. राज्याच्या कारभार महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या हातात आला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये (2014 ते 2019) भारतीय जनता पक्षाने राज्यातील सहकार क्षेत्र स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्व साखर कारखान्यांवर स्वतःच्या मर्जीतले प्रशासकीय संचालक नेमले.
भाजपने साखर कारखान्यांना होणारा कर्जपुरवठा कमी केला. परिणामी साखर कारखाने डबघाईला आले. अनेक साखर कारखाने हे राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. परंतु भाजप सरकारच्या काळात या नेत्यांचे आर्थिक आणि राजकीय नुकसान होऊ लागले. परिणामी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, साखर कारखाने वाचवण्यासाठी सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाला रामराम करत भाजपशी हातमिळवणी केली.
आता राज्यात महाविकास आघाडीचं (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच)सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रावर पुन्हा एकदा आघाडीतल्या नेत्यांचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी, तसेच साखर कारखाने भाजपच्या नियंत्रणातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ठाकरे सरकारने राज्यातल्या तब्बल 19 सहकारी साखर कारखान्यांवर भाजपने नियुक्त केलेले प्रशासक आणि शासन नियुक्त संचालक हटवले आहेत.
'या' साखर कारखान्यांवरील प्रशासक आणि शासन नियुक्त संचालक बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
1. रेणा सहकारी साखर कारखाना लातूर
2. माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती
3. नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना इंदापूर
4. आदिनाथ सहकारी साखर कारखाना सोलापूर
5. मकाई सहकारी साखर कारखाना सोलापूर
6. छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूर
7. पूर्णा सहकारी साखर कारखाना बसमतनगर हिंगोली
8. रावसाहेब पवार सहकारी साखर कारखाना शिरोळ
9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद
10. विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर
11. दूधगंगा सहकारी साखर कारखाना भुदरगड
12. आजरा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर
13. संत तुकाराम साखर कारखाना मुळशी
14. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बारामती
15. संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा
16. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा
17. भीमा सहकारी साखर कारखाना पाटस-दौंड (जिल्हा पुणे)
18. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा
19. डॉक्टर पतंगराव कदम सहकारी साखर कारखाना कडेगाव-सांगली