पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज पंढरपूरच्या पांडुरंगाचा विवाहसोहळा संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम सकाळपासूनच मंदिर परिसरात सुरु झाली होती. देवाच्या या विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली होती.


या विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील भाविक भारत भुजबळ यांनी विविध रंगांची ट्रकभर फुले मंदिर सजावटीसाठी आणली होती. भुजबळ यांच्यासोबत आलेल्या पन्नासहून जास्त कारागिरांनी रात्रभर विठ्ठल मंदिर फुलांनी आकर्षकरित्या सजविले होते. विवाह स्थळ असलेला विठ्ठल सभा मंडपाला तर फुलांनी सजवत महालाचे रुप दिले होते. सलग 48 तास आणि 60 कारागिरांच्या मदतीने ही फुलांची सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी विविध 36 प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.

लग्नवधू अर्थात जगत्जननी रुक्मिणीमातेला पांढरी शुभ्र पैठणी नेसविण्यात आली होती. तर नवरदेव विठुरायालादेखील पांढरेशुभ्र कारवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरे मुंडासे परिधान करून सजविण्यात आले होते. आजच्या विवाह सोहळ्यापासून थेट रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.

Pandharpur | वसंतपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा | ABP Majha



आज वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. विठ्ठल मंदिरातील सभामंडपाला लग्नस्थळाचे स्वरूप देण्यात आले होते. संपूर्ण सभामंडप फुलांनी सजविण्यात आला होता.

विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची भगताचार्य अनुराधा शेटे यांचे कथासोहळा ऐकण्यासाठी हजारो महिलांनी येथे गर्दी केली होती. देवाच्या कथासार सांगताच सभामंडपात नवरदेव विठुराया आणि रुक्मिणीमातेला आणण्यात आले. आणि त्यानंतर विवाहसोहळा सुरु झाला.

विठ्ठल रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींमध्ये आंतरपाट धरण्यात आला, वऱ्हाडींना अक्षता वाटून मंगलाष्टकाला सुरुवात झाली. शेवटच्या अक्षता पडताच आंतरपाट बाजूला काढून देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्यात आली. खुद्द परमेश्वराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विठ्ठल भक्तांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती.