मुंबई : राज्यातील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचे रॅकेट सुरुच असून त्यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता टीईटी या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.


राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाही संदर्भात शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल."


 






टीईटी घोटाळ्याप्रकरणी तुकाराम सुपेंना अटक
म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.


म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी- चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे जबाबदारी असलेल्या टीईटी अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे.  21 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली होती. आरोग्य भरती आणि म्हाडा पाठोपाठ शिक्षक भरतीच्या पेपरमधेही गैरव्यवहार झाल्याचे तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.


जीए  टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती.  त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्ब्ल वीस जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय  निर्माण झाला आहे. पेपर फुटीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना एका प्रकरणाचा तपास करता करता दुसऱ्या एका परीक्षेचा देखील पेपर फुटल्याचं समजलं. आता आणखी एका, तिसऱ्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं ध्यानात आलं आहे.


 


संबंधित बातम्या :