सांगली :  आपल्या देशातील शहरांची नावे बदलली आहेत. आज त्याच आक्रमकांच्या नावाने आपल्या देशात विविध गावे आणि शहरे पाहायला मिळत आहेत. देशातील हिंदुत्ववादी संघटनांकडून परकियांच्या खुणा मिटल्या गेल्या पाहिजेत हा धागा पकडत नावं बदलण्याची मागणी केली जात आहे. यातच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरांच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा समोर येत आहे. यावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. इस्लामपुरचे ईश्वरपूर करा या शिवसेनेच्या मागणीला भाजप आणि श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने मात्र यावरची आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही. एमआयएमने मात्र इस्लामपूरचे ईश्वरपूरच्या नामांतराला विरोध दर्शवलाय.


इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे नामकरण करावे, ही मागणी करत शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने इस्लामपूर नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला तर स्वाक्षरी मोहीम देखील घेतली. शिवसेनेच्या ईश्वरपूर नामकरणासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेच्या मागणीला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननेदेखील जाहीर पाठिंबा दिलाय. भारत देशावर मुगल परकियांच्या असलेल्या खुणा मिटल्या पाहिजेत,  यासाठी इस्लामपूरचे ईश्वरपूरचा ठराव नगरपालिकेत एकमताने मंजूर करावा. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष राजकारण बाजूला ठेवून राष्ट्र, संस्कृती स्वाभिमान जपत ईश्वरपूरच्या नामकरणास  पाठिंबा द्यावा अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने केले आहे.


तसे इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरन करावे ही जुनी मागणी आहे. 1986 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर येथील एका सभेत शहराचे नामकरण ईश्वरपूर असे केले होते. तेव्हापासून विविध संघटनांनी ईश्वरपूर नामकरणसाठी पाठपुरावा केला होता.  ईश्वरपूर हे नाव ऐतिहासिक पाऊलखुणा असलेले नाव आहे. जिल्हास्तरीय आणि राज्य शासनाच्या स्तरावर याची शिफारस नगरपरिषद करणार आहे. नगर परिषदेचे कौन्सिल सर्वोच्च असल्यामुळे कौन्सिलचा निर्णय हा शिफारसही गेल्यावर निश्चितपणे या बाबतीमध्ये शासन सकारात्मक भूमिका घेईल अशी आम्हाला आशा आहे असे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


एमआयएम पक्षाने मात्र इस्लामपूरच्या नामांतरनास विरोध दर्शवलाय. इस्लामपूरच्या नामांतरामागचे कारण आधी स्पष्ट करावे, केवळ इस्लाम शब्दाला विरोध आहे हे आम्हाला कळवावे असे एमआयएमने मागणी केलीय. शिवसेना पक्ष महाविकास आघाडीत असतानासुद्धा इस्लामपूरमध्ये शिवसेनेनं नामांतराचा विषय पुन्हा काढला आहे. यावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका या विषयावरची  स्पष्ट करावी असं देखील एमआयएमकडून सांगण्यात आलेय.


देशातील अनेक राज्यांमधील शहरांची नावे बदलली गेल्यानं आता पुन्हा एकदा इस्लामपूर शहराचे नामांतरण याचा विषय इस्लामपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर गाजताना दिसत आहे.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha