उस्मानाबाद : पोलिसांनी पाच हजार रुपये एन्ट्री मागितल्याने ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या चालकाने पोलीस ठाण्यातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना उस्मानाबादच्या येरमाळा येथे घडलीय. दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी चालकाला खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.


चार वाजेच्या सुमारास कोल्हापूर येथून वाशिम जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो कारवाईसाठी बी.बी.कोकरे यांनी पोलिस ठाण्यासमोर अडवला. पोलिस चालकाला पाच हजार रुपये एन्ट्री मागण्याच्या बाचाबाचीत टेम्पो चालक  बालाजी पावडे (रा. गडहिंगलज जि. कोल्हापूर) यांनी एन्ट्री मागीतल्याच्या कारणावरुन मी गळफास घेतो म्हणत पोलीस ठाण्यातील झाडावर चढला, तो झाडाला गळफास घेण्यासाठी दोरी बांधत असताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी झाडावर चडून चालकास खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने घडला प्रकार पाहण्यासाठी पोलीस ठाण्यात बघ्यांनी तोबा गर्दी केली होती. या प्रकारानंतर वाहन चालकांवर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने कारवाईचा प्रयत्न केला. पण, घटनास्थळी पत्रकार पोहोचल्याने त्यांनी चालकाला सोडून दिले.


पोलीस दलात वाहनधारकांडून दंड वसुलीसाठी ई चलन मशीन आल्यापासुन पोलीस वाहन परिवहन खात्याच्या महसुलात भर पडली असली तरी या मशीनमुळे वाहनधारकांना नाहक त्रास वाढला आहे. अशा मशीनमुळे काही ठिकाणी वाहनधारकांनी एन्ट्री देण्यास नकार दिल्यास ई मशीनद्वारे त्या वाहन क्रमांकावर दंड टाकण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे वाहन धारकांची रोखीने ऑनलाईन पद्धतीने लुट होत आहे.


याशिवाय वाहनातून वाहतूक केल्या जाणाऱ्या वस्तु, फळं, पालेभाज्या, दूध, दही, बंद पाणी बॉटल, केक, आईस्क्रीम आदी वस्तु वाहनधारकाकडून वसुल केले जात असल्याचे तेरखेडा येथील बेकरी चालक सुधीर घोलप यांनी सांगितले. तर बंद पाणी बॉटल एजेन्सीचे चालक उपळाई येथील दत्ता ढाळे यांनी बोलताना सांगितले की 25 वर्षांपासून धंदा करतो पण कधी पाणी बॉटल बॉक्स मागितले नाहीत. पण, सपोनि गणेश मुंढे आल्यापासूनच हे प्रकार वाढले असुन पाणी बॉक्स द्या नाहीतर ऑनलाईन गाडी नंबरवर दंड टाकण्याची धमकी दिली जाते, असे ते म्हणाले.


या बाबत सपोनि गणेश मुंढे यांना सदरील प्रकारा बाबत संपर्क साधला असता त्यांनी समोर या बोलू म्हणत फोन बंद केला. या बाबत पीएसआय ज्ञानेश्वर राडकर यांना संपर्क साधला असता त्या गाडीवर पूर्वीचा तीन हजार दंड दिसत असल्याने त्याला कर्मचाऱ्यांनी दंडाची मागणी केली. दंड भरण्यास टाळाटाळ करण्यासाठी त्या चालकाने आत्महत्येचा बनाव केल्याचे ते म्हणाले. वाहन चालकाला संपर्क साधला असता चालक बालाजी पावडे यांनी मला सोडून दिले असून माझ्या पोलीस हातपाया पडल्याने मी ही कारवाई केली नाही. पत्रकार आल्याने त्यांनी मला सोडले, तुमचे आभार. नाहीतर माझ्यावर कारवाई केली असती, असे त्यांनी सांगितले.