मुंबई : काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) केली. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबतही भाष्य केलं. तसेच कोरोनाचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक असल्याचं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 


"कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईत दररोजचा आकडा 300 ते 350 वर गेला होता. किंबहुना आपल्या राज्यात दररोजची रुग्णसंख्या ही 2 हजारांपर्यंत खाली आली होती. ती पुन्हा 11 हजार, 12 हजार, 13 हजारांच्या टप्प्यांत गेली आहे. मास्क घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं ही त्रिसूत्री आहेच. ही पाळणं गरजेचं आहेच परंतु, आता मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु केलेलं आहे. अनेकजण आजही टेस्ट करून घ्यायला नकार देत आहेत. कारण विलगिकरण कक्षात जाव लागेल का? 80 टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना लक्षणं नाहीत. टेस्ट करून घ्यायला घाबरू नका." असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, "शहरांसह ग्रामीण भागात देखील कोरोना वाढत आहे. त्रिसुत्रीचे पालन करणं गरजेचं आहे, कोरोना लसीकरण देखील आपण मोठ्या प्रमाणावर करत आहोत. ग्रामीण भागात होम क्वारंटाईनची मुभा दिली आहे. पण होतंय काय? 80 टक्के लोकांना लक्षणे नाहीत. मग लक्षणे नाहीत तर जाऊन येऊ जरा, गप्पा मारत बसलो तर काय? त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्याकडे पहिला रुग्ण सापडला होता. किमान एप्रिलच्या शेवटापर्यंत तरी आपल्याला सतर्क राहावं लागेल. दुर्दैवाने फेब्रुवारीतच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. अजूनही सप्टेंबरमध्ये आपण ज्या पीकवर होतो. त्या पीकवर आपण जाऊ नये हे आपले प्रयत्न असले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा काही निर्बंध पाळावे लागतील. लस घेतल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिर्वाय आहे, हात धुणं, अंतर ठेवणं ते हिताचं आहे. कार्यालयांमध्ये, हॉटेल्समध्ये जिथे जिथे बंदिस्त जागेमध्ये गर्दी होते. तिथे बंधनं लागू करावी लागतील. त्यासंदर्भातील नियमावली आपण एक दोन दिवसांमध्ये जारी करत आहोत. जो जगाचा अनुभव आहे, त्यातूनच आपण जातोय. पाश्चिमात्य देशांमध्ये काही महिने त्यांनी अत्यंत कडक लॉकडाऊन जारी केला होता."


"पूर्वी  'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजना राबवत होतो, तेव्हा लोक समोर येऊन किती जण राहतात इत्यादी सांगत होते. परंतु आता सदस्यांची माहिती लपवली जातेय. काही ठिकाणी तर ज्या घरांमध्ये कोरोना लक्षणे असलेले आहेत ते शेजार्‍यांना सांगून कुलूप लावून बाहेर गेले असे सांगत आहेत. असं करू नका. यामुळे स्वतःला तर धोका आहेच, पण आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालत आहात." असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


MPSC Exam | उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल, परीक्षा आठवड्याभरात होईल: मुख्यमंत्री