पंढरपूर : विठुरायाच्या नगरीमधील बाटली आडवी करण्यासाठी आता पुन्हा वारकरी संप्रदायाने जोरदार तयारी केली आहे. मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत शहरातील मांस तसंच मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला.
पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून इथे मांस आणि मद्य विक्री बंद करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदाय गेली अनेक वर्षे मागणी करत आहे. फडणवीस सरकारने नव्याने केलेल्या मंदिर समिती पुनर्रचनेत वारकरी संप्रदायाला मोठे स्थान मिळाले. त्यानंतर वारकरी संघटनांनी आज पुन्हा मंदिर समिती बैठकीपूर्वी आपल्या मागण्याची निवेदनं मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना दिली होती.
याचे पडसाद मंदिर समितीच्या बैठकीत दिसून आले आले. बहुतांश सदस्यांनी वारकरी संप्रदायाच्या मागणीला एकमुखाने पाठिंबा दर्शवल्याने, बैठकीत शहरातील मांस-मद्य विक्रीवर बंदीचा ठराव घेण्यात आला. आता मंदिर समिती हा ठराव शासनाकडे पाठवणार असून समिती अध्यक्ष आणि सदस्य असलेले दोन आमदार त्यााच मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री वारकरी संप्रदायाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय देतील, असं समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. यापूर्वी भाजप खासदार अमर साबळे यांनीही याबाबत मागणी केली होती मात्र पाठपुरावा न झाल्याने यावर निर्णय होऊ शकला नव्हता. आता खुद्द वारकरी संप्रदायाच्या मदतीला मंदिर समितीच उभी राहिल्याने यावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा वारकरी संप्रदायाला आहे.
दरम्यान राज्यभरातून इथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या गावातही मांस-मद्य विक्रीची दुकाने असतात, मग पंढरपूरमधील दुकानं बंद करण्याचा अट्टाहास कशाला, असा सवाल हॉटेलचालक उत्तम अभंगाराव यांनी केला आहे. यामध्ये काही कायदेशीर अडचणी असल्या तरी आता राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे वारकरी संप्रदाय डोळे लावून बसला आहे.
विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2018 05:21 PM (IST)
पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून इथे मांस आणि मद्य विक्री बंद करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदाय गेली अनेक वर्षे मागणी करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -