पंढरपूर : देवाक काळजी म्हणतात ना... तेच खरंय माऊली... शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करुन लाडक्या पांडुरंगाच्या एका दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी देवच धाऊन आला आहे.

येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील वारकऱ्यांना रांगेशिवाय थेट विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीनं त्रिलोक सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार करुन ही व्यवस्था त्यांच्याकडे सोपवली आहे. आज (मंगळवार) झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता येत्या काही दिवसात विठ्ठलाच्या दर्शनासाठी ताटकळत उभं राहावं लागणार नाही. म्हणजे आता 40-40 तास वाट पाहणं नाही, आंघोळी-पांघोळीविना ताटकळणं नाही, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचे हाल नाहीत., बाया-बापड्यांची विवंचना नाही. विनामूल्य टोकन घ्यायचं. त्यावर दिलेल्या वेळी मंदिरात जायचं आणि पांडुरंगाचरणी लीन व्हायचं.

तिरुपती, वैष्णोदेवी आणि शिर्डीमध्ये जशी सिस्टीम आहे ना अगदी तशीच व्यवस्था पंढरपूरमध्येही असणार आहे. त्रिलोक सिक्युरिटी सिस्टिम ही एजन्सी हे काम बघणार आहे. शहरात 30 ठिकाणी हे टोकन मिळतील. एका मिनिटात 45 भाविकांना दर्शन मिळणार. तर एका दिवसात 70 हजार भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता येईल.

तेव्हा यंदाची आषाढी सुकर असेल अशी आशा आहे. या नव्या सुविधेला यश येऊ दे अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना...