Maharashtra Temperature Alert: राज्यात उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा,विदर्भ चांगलेच तापले आहेत. कोकणात सध्या हवामान विभागाने उष्णेच्या लाटेचा इशारा दिलाय. त्यामळे तापमानाने रत्नागिरी,रायगडसह मुंबईकरांना सध्या चांगलाच घाम फोडलाय. मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय.बहुतांश ठिकाणी 36 अंश सेल्सियसच्या पुढे पारा जात आहे. राज्यात सर्वाधिक 38.8 तापमान सोलापूरमध्ये नोंदवले जात आहे. पुणे 36.4 अंशावर गेलंय. कमाल तापमान चढेच असून गेल्या 24 तासांत किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाल्याचे सांगण्यात आले. राज्यात येते पाच दिवस महत्त्वाचे राहणार असून तापमानाचा उच्चांक पहायला मिळणार आहे. तापमानाचा पारा 2-4 अंशांनी वाढणार आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचं IMD नं सांगितंलय. (Heat Wave)
पाच जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोकण आणि मुंबई ठाणे पालघर भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. पुढील पाच दिवस मुंबई व उपनगरात तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. आज (9 मार्च 2025 ) ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट आहे. साधारण 11 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा असून त्यानंतर उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम राहणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य असा आणि परिसरात सक्रिय आहे. तसेच तमिळनाडू आणि आजूबाजूच्या भागात चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिणेत केरळमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांनाही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. उर्वरित देशात कोरडे व शुष्क वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानाचा पारा ही वाढला आहे. सध्या पश्चिमी चक्रवात इराकच्या दिशेने असल्याने हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांना काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकण व गोवा तसेच मुंबईत उष्णतेची लाट असल्याचे वर्तवण्यात आले आहे.
राज्यात कुठे कसे तापमान?
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रसह विदर्भ प्रचंड तापलाय. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस होते. सांगलीत 37.2, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे 36.4 ते 36.7° वर गेले. मराठवाड्यात प्रचंड रखरख वाढली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 36.2°c चे शनिवारी नोंद झाली. बीड ,परभणी 36 अंशांवर आहेत. विदर्भात बहुतांश ठिकाणी पारा 36 अंशांच्या पुढे गेला. वाशिम ,अकोला,अमरावती, वर्धा या जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअसची नोंद झाली.