Organic Food : मागच्या काही वर्षांमध्ये देशात कॅन्सरच्या प्रकरणामध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच कॅन्सरमुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये देखील वाढ झाली आहे. या कॅन्सरवाढीला विविध कारणं आहेत. त्यातील महत्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली हे देखील आहे. दरम्यान, वाढत जाणाऱ्या कॅन्सरचा धोका लक्षात घेता पुण्यातील एका दाम्पत्यानं पुढाकार घेतला आहे. या दाम्पत्यानं कॅन्सरमुक्तीसाठी एक पाऊल उचललं आहे. प्रकाश टेमघरे आणि हर्षदा टेमघरे असं या दाम्पत्याचं नाव आहे. हे दाम्पत्य विषमुक्त आणि रसायनमुक्त तयार जेवण लोकांना पुरवत आहे. सेंद्रीय शेत मालापासून तयार केलेल्या जेवणाची टिफीन सेवा सुरु टेमघरे दाम्पत्यानं सुरु केली आहे.
'अभिनव भोजन विषमुक्त भोजन'
1 जानेवारी 2020 रोजी 'अभिनव भोजन विषमुक्त भोजन' ही सेवा सुरु केली. गेल्या दोन वर्षापासून टेमघरे हे दाम्पत्य विषमुक्त अन्नाची सेवा देत आहे. ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळत असल्यामुळं ग्राहकही खुश असल्याचे प्रकाश टेमघरे यांनी सांगितली. सध्या पुण्यातील वारजे आणि बाणेर अशा दोन ठिकाणी अभिनव भोजनाची किचन सेवा सुरु आहे. या दोन ठिकाणावरुन दररोज 350 ते 400 लोकांना टिफिन सेवा पुरवली जाते. त्यामुळं एकूण 16 महिलांना रोजगार मिळाला आहे तसेच 4 ते 5 रिक्षा चालकांनाही रोजगार मिळाला आहे. येत्या काळात महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून द्यायचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच त्याद्वारे सेंद्रीय उत्पादन घेणार्या शेतकर्यांच्या शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट ठेवलं आहे.
विषमुक्त जेवण देण्याचा निर्णय का घेतला
साधारण 5 वर्षांपूर्वी प्रकाश टेमघरे यांच्या पत्नी हर्षदा टेमघरे यांनी कॅन्सर या आजाराची लागण झाली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ सचिन हिंगमिरे यांनी हे निदर्शनास आणून दिले. उपचारासाठी त्यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. उपचार सुरु झाले. त्यानंतर साधारण सहा महिन्यानंतर हर्षदा टेमघरे या आजारातून बाहेर पजल्या. या काळात लाखो रुपये खर्च झाले. प्रचंड मानसिक तणावातून माझे कुटुंब, नातेवाईक बाहेर पडले. उपचार सुरु असतानाच आम्ही इतर कर्करोग विशेष तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत होतो. माझ्या घरात कुणीही व्यसनाधीन नाही, माझी पत्नी हर्षदाचे वयही 32 ते 33 असताना एवढ्या कमी वयात कॅन्सर कसा झाला? असे प्रश्न मी तज्ञ्जांना विचार होतो असे प्रकाश टेमघरे यांनी सांगितले.
अभिनव फार्मर्स क्लब सेंद्रीय भाजीपाल्यांची खरेदी
बऱ्याच कर्करोग तज्ञांशी चर्चा करुन माहिती मिळवली असता बेसुमार रासायनिक खते, पिकांवरील औषधे आणि किटकनाशके वापरण्यात आलेले अन्नधान्याचा रोजच्या खाण्यात वापर, तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सर झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितले. त्याचवेळी आम्ही ठरवलं की इथून पुढे फक्त रसायनमुक्त, विषमुक्त, सेंद्रीय (Organic) शेतमालाचा वापर रोजच्या जेवणात करायचा. उपचारादरम्यान रसायनमुक्त सेंद्रीय शेतमाल पुण्यात कोणते शेतकरी पिकवतात याची माहिती घेत होतो. यावेळी आम्हाला 'अभिनव फार्मर्स क्लब' या भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपचे नाव समजले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. उपचारादरम्यानच आम्ही त्यांच्याकडून सर्व रसायनमुक्त शेतमाल विकत घेऊ लागलो.
मी आजारातून पूर्ण बरी झाल्यानंतर आम्ही इतर कुटुंबांना देखील सेंद्रीय अन्नधान्य खाण्याचे फायदे सांगून त्यांनाही सेंद्रीय शेतमाल देऊ लागल्याचे हर्षदा टेमघरे यांनी सांगितले. याच दरम्यान नवीन काहीतरी करण्याचा विचार सतत माझ्या मनात येत होता. त्याचबरोबर मला मिळालेल्या पुनर्जन्माचा उपयोग मी इतर लोकांना कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा निर्णय घेतला. त्यावेळी मला नवीन कल्पना सुचली. आपण लोकांना डब्यातून विषमुक्त जेवण देऊ असा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही अभिनव फार्मकडून सर्व सेंद्रीय शेतमाल खरेदी करुन त्यापासून विषमुक्त अन्न तयार करु लागलो, ते अन्नाची टिफीन सेवा सुरु केली.
कोरोना काळात पेशंटला जेवणाची सेवा
लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद पडले होते. यावेळी कोरोनाच्या पेशंटला नियम पाळून पौष्टिक जेवण देण्याची सेवा सुरु केली. दररोज आम्ही तिन्ही वेळेला नाश्ता, लंच, डिनर असे 400 ते 450 डबे रोज देत होतो. त्यापैकी 50 ते 75 जणांना विनाशुल्क जेवण देत होतो. त्याचबरोबर काही कोव्हिड हॉस्पिटलमध्ये देखील पेशंटला जेवण देत होतो. या काळात आम्ही कोव्हिड पेशंटला जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त जेवण देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रकाश डेमघरे यांनी दिली.
दरम्यान, आम्ही पितळ आणि मातीच्या भांड्यात जेवण तयार करतो. एका डब्यात तीन चपाती, एका भाजी, डाळ. सॅलेड, देशी गायीचे तूप आणि सेंद्रीय फळे अशा प्रकारचा डबा असतो. एक डबा आम्ही 120 रुपयाला देतो अशीही माहिती प्रकाश टेमघरे यांनी दिली. यामुळं 10 ते 15 महिलांना रोजगार मिळाला आहे. तसेच 4 ते 5 रिक्षांना देखील रोजगार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.