औरंगाबाद : बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकल्याने मराठवाड्यातील 750 उच्चमाध्यमिक विनाअनुदानित शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातले एक हजार पेपर गठ्ठे विनातपासताच परत पाठवण्यात आले आहेत.


शाळांना अनुदान मिळत नसल्याने पेपर तपासण्यावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्यातील 750 उच्चमाध्यमिक शाळांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान बारावीचा निकाल वेळेवरच लागेल, असं शिक्षण विभागाने परीक्षेपूर्वीच स्पष्ट केलं होतं. मात्र विनाअनुदानित शाळांच्या बहिष्काराच्या पवित्र्यामुळे निकालावर सावट आहे.

निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षण विभागाकडून ही कोंडी कशी सोडवली जाते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.