मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेली बेड्सची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेच्या कोचेसचा वापर करावा. तसेच मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या गोडाऊनमध्ये कोविड सेंटर उभारावे, अशी विनंतीवजा सूचना खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि तुटवडा यावर तोडगा काढण्यासाठी त्याचे वितरण केवळ राज्य सरकारच्या अधिकृत केंद्रामधूनच केले जावे, अशीही सूचना खासदार शेवाळे यांनी केली आहे.


खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करते आहे. मात्र, बेड्सची कमतरता भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाची मदत घेणे गरजेचे आहे. पश्चिम रेल्वेकडे 480 आणि मध्य रेल्वेकडे 410 अद्ययावत कोचेस उपलब्ध असून यामध्ये 2500 बेड्सची व्यवस्था केली जाऊ शकते. यासंदर्भात माझे रेल्वेच्या दोन्ही महाव्यवस्थापकांसोबत बोलणे झाले असून त्यांनी यासाठी संमती दर्शवली आहे.
 
तसेच, दक्षिण मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सुमारे 950 एकरातील गोडाऊनमध्ये मोठे कोविड सेंटर उभारले तर, राज्य शासनाला खर्चही कमी लागेल आणि मुंबई महानगरपरिसरतील सर्व रुग्णांना एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे या सूचनांवर राज्य सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.


रेमेडेसिवीरचे वितरण केवळ सरकारी केंद्रातून करावे


रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार यावर उपाय म्हणून खासगी मेडिकल स्टोअरमध्ये रेमडेसीविर विकण्यास सरकारने बंदी घालावी. या इंजेक्शनचा सर्व साठा सरकारने ताब्यात घ्यावा. याचे वितरण करण्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर सरकारी केंद्रे उभी करावीत. रेमडेसिवीरचा साठा आणि वितरण केवळ 'अन्न व औषध विभाग' (एफडीए) आणि 'हाफकीन इन्स्टिट्यूट' यांच्यामार्फतच केला जावा, अशी सूचनाही खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.