पुणे: मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू झाला आहे. ताहिर मर्चंटची प्रकृती बिघडल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.


 

ताहिर मर्चंट हा मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनचा सर्वात जवळचा साथीदार होता.

12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी, विशेष टाडा कोर्टाने ताहीरला फाशीची शिक्षा सुनावली होती. 7 सप्टेंबर 2017 रोजी कोर्टाने हा निर्णय दिला होता. मात्र ताहिरच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने 5 डिसेंबर 2017 रोजी स्थगिती दिली होती.

कोण होता ताहिर मर्चंट?

  • ताहिर हा याकूब मेमनचा जवळचा साथीदार होता. 1993 मध्ये कोर्टाने ताहिरविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.

  • ताहिरने मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटाचा कट रचत, त्याच्या अंमलबजावणीसाठी दुबईत बैठका आयोजित केल्या होत्या.

  • या बैठकांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह टायगर मेमनही हजेरी लावत असे.

  • साखळी स्फोटानंतर ताहिर भारत सोडून पळाला होता. त्याला 2010 मध्ये दुबईतील अबूधाबीमध्ये अटक करण्यात आली होती.

  • ताहिर मर्चंट हा ताहिर टकल्या म्हणूनही परिचीत होता.


फाशीची शिक्षा

12 मार्च 1993 ला मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी 7 सप्टेंबरला ताहिर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याचप्रकरणी करीमुल्लाह खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बॉम्बस्फोटातील काही आरोपींना पाकिस्तानला पाठवल्याप्रकरणी ताहिर मर्चंटला टाडा कोर्टानं त्याला दोषी ठरवलं.

12 मार्च 1993 सा मुंबईत तब्बल 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटात मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. या स्फोटात 27 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमनसह तब्बल 27 आरोपी अद्यापही फरार आहेत.

संबंधित बातम्या

अबू सालेमला 25 वर्षे, करिमुल्लाला जन्मठेप, ताहीर आणि फिरोजला फाशी


 1993 बॉम्बस्फोटातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीला स्थगिती