नाशिक : देशातील दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा निर्माण झाला असतानाच नाशिकमधून चिंता वाढवणारी बातमी आहे. नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये 20, 100, 200 आणि 500 च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने 20 आणि 100 च्या नोटांचं नवीन डिझाईन मंजूर न केल्याने नोटांची छपाई थांबली आहे, तर 200 आणि 500 च्या नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर त्याचा परिणाम झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे, मात्र एप्रिलपासूनची ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारी दिरंगाईचा परिणाम स्वाभाविकपणे नोटांच्या छपाईवर झाला आहे. तर ही छपाई बंद होणे आणि सध्याचा चलन तुटवडा यांचा संबंध नसल्याचा दावाही केला जात आहे.

देशातील नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई होते. नाशिकमध्ये दररोज साधारणपणे पाच दशलक्ष नोटा छापल्या जातात. या नोटा देशभरात पुरवल्या जातात. तर या नोटांच्या छपाईसाठी लागणारी शाई ही परदेशातून येते.

दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात एटीएम 'कॅशलेस' झाल्याचं नागरिक सांगत आहेत. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात खूप जास्त नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे. नोटाबंदीच्या वेळी 17.5 लाख कोटींपेक्षा जास्त रोकड चलनात होती, तर सध्या 18 लाख कोटींच्या पार रक्कम चलनात आहे, असं सरकारने सांगितलं.

सध्या व्यवस्थेत 6.7 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. ही रक्कम आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा थांबवण्यात आला, अशी माहिती आर्थिक विषयांचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. दोन हजाराच्या नोटांची साठवणूक होत असल्याची शक्यता गर्ग यांनी नाकारली नाही.

फक्त दोन हजारच नाही, तर चलनात आलेल्या इतर नोटाही बँकिंग व्यवस्थेत कमी प्रमाणात येत आहेत, असं गर्ग म्हणाले.

संबंधित बातम्या :

नाशिक, देवास प्रेसमध्ये एका दिवसात रेकॉर्डब्रेक नोटांची छपाई


नाशिक प्रेसमधून तब्बल 1 हजार कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे


नाशिक प्रेसमध्ये 50,100 च्या 35 लाख नोटांची छपाई


नाशिकच्या प्रेसकडून 500 च्या 50 लाख नोटा आरबीआयला सुपूर्द