UPSC Results: - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फेत घेण्यात आलेल्या युपीएससी 2023 (UPSC) च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये, देशातील 1016 उमेदवारांनी रँकींग मिळवत यश संपादन केले. उत्तर प्रदेशच्या आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला येण्याचा मान पटकावला असून महाराष्ट्रातील 4 विद्यार्थ्यांनी पहिल्या 100 मध्ये स्थान पटकावले आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे कष्ट आणि जिद्दीची कहानी, कुणा अधिकाऱ्याला प्रेरणास्थान मानून सुरू केलेला प्रवास, जिथं स्वत:ला लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनवून थांबतो त्याला युपीएससी म्हणतात. गेल्या काही वर्षात युपीएससी परीक्षेतून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांचा टक्का वाढत आहे. परिस्थितीशी दोनहात करत हे विद्यार्थी आपलं आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करत आहेत. सोलापुरातील (Solapur) स्वाती राठोड या विद्यार्थीनीच्या यशाची कथाही अशीच आहे.  


केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये, स्वाती राठोडने 492 वी रँक घेऊन दैदिप्यमान यश मिळवले. परीक्षेतील यशामुळे स्वातीने स्वत:चे स्वप्न पूर्ण करत, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केलंय. कारण, रस्त्यावर गाडा लावून भाजी विकणाऱ्या आई-वडिलांची कन्या आता सनदी अधिकारी बनलीआहे. त्यामुळे, सोलापूरची स्वाती आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचं रोल मॉडेल ठरली आहे. 


मजूर अन् भाजीविक्री करुन लेकरांना शिकवलं


स्वातीच्या वडिलांनी सुरुवातीला मुंबईत मजुरीचं काम केलं. मात्र, कुटुंबासमवेत मुंबईत राहणं अवघड बनत असल्याने त्यांनी सोलापूर गाठलं. सोलापुरात गाड्यावर भाजी विक्री करुन उदरनिर्वाह केला. त्यातूनच आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन स्वातीनेही युपीएससी परीक्षेत बाजी मारली, तिने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं.स्वातीचे आई-वडिल सोलापुरातील विजापूर रोड, राजस्व नगर येथे राहतात. ज्या परिसरात ते राहतात त्याच परिसरात आई-वडील दोघे मिळून गाड्यावर भाजी विक्री करतात. 


सोलापुरातच घेतले पदवीचे शिक्षण


स्वातीचे दहावीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबईतील वाशी येथे झाले. वाशीत तिचे वडील मजुरीचं काम करायचे. मात्र, कौटुंबिक कारणास्तव राठोड कुटुंबीय सोलापुरात स्थायिक झाले. तेव्हापासून स्वातीचे आई-वडिल भाजी-विक्रीचा व्यवसाय करतात.स्वाती सध्या भूगोल विषयातून ती एम.ए.करत आहे. त्यातच, स्पर्धा परीक्षांची तयारीही ती करत होती. दरम्यान, 2023 च्या युपीएसी परीक्षेत स्वातीने बाजी मारली. स्वातीने सोलापुरातील भारती विद्यापीठ येथे अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर, वसुंधरा महाविद्यालयात बीए पूर्ण केले आहे. स्वातीच्या या यशामुळे तिने स्वत:चे, कुटुंबीयांचे आणि आपल्या महाविद्यालयाचेही नाव झळकावले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचं विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.


अभ्यासासाठी पुण्यात भाड्याने रुम


स्वाती राठोड कुटुंबासोत सोलापुरातच राहते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे साहजिक छोटसं घर असल्याने अभ्यासात अडथळा निर्माण व्हायचा. त्यामुळे, तिच्या वडिलांनी पोटाला चिमटा देऊन मुलीला पुण्यात भाड्याने रुम घेऊन दिली. ज्यामुळे,स्वातीला अभ्यास करणे सोपं झालं. तेथूनच तिने युपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यानंतर, ती सोलापुरात परतली. अखेर, तिच्या आणि आई वडिलांच्या कष्टाचं जीच झालं अन् भाजीवाल्याची लेक सनदी अधिकारी होऊन मॅडम बनली.