Swargate Bus Rape Case : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची टीम कामाला लागली. पण तो अजूनही हाताबाहेरच आहे. त्यामुळे विरोधक पोलिसांवर आगपाखड करत आहेत. तर पोलिसांचा बचाव करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वद पेटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आता या घटनेनंतर परिवहन खातं खडबडून जागं झाल्याचं दिसतंय.
शिरुरच्या गुनाट गावात 140 पोलिसांचा ताफा तैनात असून आरोपीचा शोध घेतला जातोय. ऊसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला जातोय. तर ड्रोनच्या नजरेतूनही आरोपीला शोधलं जातंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर आहेत. दरम्यान व्हिडीओत दिसणाऱ्या या घरात आरोपीने पाणी प्यायलं होतं. इथे तो काही वेळ थांबला होता. त्यानंतर तो बेपत्ता झालाय. दरम्यान या परिसरात पोलिसांनी शोधमोहिम केली मात्र अंधार पडल्याने आणि बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांना शोधमोहीम थांबवावी लागलीये. आणि रिकाम्या हाती परतावं लागलंय.
सुमारे 100 पोलिसांचा फौजफाटा, श्वानपथक, ड्रोनची मदत... एका नराधमाला शोधण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागली. स्वारगेट स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडून दोन दिवस उलटले. पण आरोपी दत्ता गाडे अजूनही फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचं पथक शिरूरमधल्या गुनाट गावात पोहोचलं.
नराधमासाठी यंत्रणेची फिल्डिंग
गुनाट गावात 100 पोलिसांचं विशेष पथकाने शोध सुरू केला. श्वान पथकाकडूनही शोध सुरू झाला. पाच ड्रोन्सच्या सहाय्याने... क्राईम ब्रँचचे पोलिसही कामाला लागले. बलात्कार करून पळून जाणारा गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी थांबला होता ही माहितीसुद्धा समोर आली.
एवढी माहिती हाताशी असूनही आणि एवढा आटापिटा करूनही दत्ता गाडे मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे आजची शोधमोहीम थांबवण्याची वेळ पोलिसांवर आली.
पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडेची माहिती देणाऱ्यांना एक लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. पण दोन दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यानं विरोधकांनी पुणे पोलीस आयुक्तांवर कोरडे ओढलेत.
गृहराज्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मात्र पोलिसांची बाजू घेतली. घटना घडली तेव्हा महिलेकडून कोणताही प्रतिकार झाला नाही. ही घटना घडत होती त्यावेळी बसच्या आजूबाजूला दहा ते पंधरा लोक होते. त्यावेळी प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते, असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं.
दोन दिवसांनंतरही नराधम फरारच
स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कारानंतर आता परिवहन विभाग खडबडून जागं झालं आहे. सुरक्षेसाठी एसटीमध्ये सीसीटीव्ही, एआयसारख्या उपाययोजना करण्याचा इरादा परिवहनमंत्र्यांनी जाहीर केला आणि मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्याही केल्या.
आरोपीच्या एका मैत्रिणीनं त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. गाडे तिच्या इतर मैत्रिणींशी ओळख करून देण्यासाठी तिच्या मागे लागला होता. तसेच त्याचे मेसेजही तिनं पोलिसांना दाखवले. गाडे किती सराईत गुन्हेगार आहे, हे आता समोर आलं आहे. प्रश्न आहे तो म्हणजे त्याच्या शोधासाठी एवढी यंत्रणा लावूनही तो लपलाय कुठे?
ही बातमी वाचा: