Mahavitran News : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे. आता कार्यकर्त्यांनी काहीसा आक्रमक पावित्रा घेतला आहे. पंढरपूर या ठिकाणच्या महावितरण कार्यालयात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट जिवंत नाग भेट दिला आहे. तर सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अज्ञात संतप्त शेतकऱ्यांनी साप सोडला असून महावितरणचे कार्यालयही पेटवून दिले आहे.
शेतीसाठी दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर आंदोलन सुरु केले असून आज पंढरपूर मध्ये स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जिवंत नाग भेट दिला. शेतीला रात्रीची वीज मिळत असल्याने पाणी द्यायला गेल्यावर साप, नाग अशा प्राण्यांमुळे शेतकऱ्याच्या जीवाला वारंवार धोका होत असतो. वारेमाप विजेची बिले जगाच्या पोषणकर्त्याकडून वसूल करता आणि वीज मात्र रात्री देऊन त्याला मरायला सोडून देता, असा संतप्त सवाल स्वाभिमानीचे पदाधिकारी सचिन पाटील यांनी अधिकाऱ्यांना केला. यावेळी शेतात सापडलेला भला मोठा जिवंत नाग त्यांनी बरणीत भरून अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आणला होता. यावेळी स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन अधिकाऱ्यांनी स्वीकारले मात्र जिवंत नागोबाच्या बरणीला काही अधिकाऱ्यांनी हात लावला नाही. तुम्हाला बंद बरणीत नाग हातात घेण्याची भीती वाटते आणि आम्हाला तुमच्यामुळे धोकादायक स्थितीत रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यावेळी अशा अनेक घातकी जनावरांचा धोका आम्हा शेतकऱ्यांना असतो याचे भान ठेवा अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सचिन पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raju shetti : मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, बळीराजाचा जीव वाचवण्यासाठी दिवसा वीज द्या : राजू शेट्टी
- Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?
- Pune Farming : विनामातीची, हवेत पिकणारी अनोखी शेती; लोणावळ्यातील प्रयोगाची होतेय चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha