सांगली : सांगली महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजप आपली सत्ता अबाधित ठेवणार की मग महाविकास आघाडीची सत्ता येणार याचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहणार असं चित्र दिसतंय. आज सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी ऑनलाइन सभा होणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सात नाराज नगरसेवक मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल झाले होते.  सोमवारी रात्री उशीरापर्यंत देखील हे नगरसेवक संपर्काच्या बाहेरच असल्याने महापालिकेतील भाजपची सत्ता आता धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

भाजपकडून मात्र हे सात नगरसेवक भाजपसोबतच आहेत असा दावा केला जातोय.  तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत नाराज असलेल्या नऊ नगरसेवकांचं मन वळवण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकसंघ झाली आहे. भाजपचे नाराज नगरसेवक आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा आघाडीकडून आजही केला जात आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपकडेच महापौरपद राहणार की यंदा निवडणुकांमध्ये परिवर्तन होणार याचा फैसला काही तासातच होणार आहे.

सांगली महापालिकेत जयंत पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील, काँग्रेस नगरसेवक नाराज, तर भाजप नगरसेवक गायब!



भाजपकडून शेवटचा प्रयोग म्हणून नाराज नगरसेवकांना पुढील अडीच वर्षात पदाची खिरापत वाटपाचा फॉर्म्युला पुन्हा बाहेर काढला गेला आहे. अडीच वर्षात भाजपकडून 10-10 महिन्यांसाठी तीन महापौर बनवण्याचा प्रस्ताव नगरसेवकांसमोर मांडण्यात आला आहे. उपमहापौर आणि अन्य पदांसाठी हाच फॉर्म्युला लागू असणार आहे. मात्र याला भुलून भाजपपासून दूर गेल्याची चर्चा असलेले सात नगरसेवक पुन्हा भाजपच्या गोटात येणार का हादेखील मोठा प्रश्न आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महापौर आणि सत्तेच्या वाट्यातील वाद मिटला असून ऐनवेळी महापौरपदाचे अंतिम नाव आज जाहीर केले जाण्याचीदेखील शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसकडून विश्वजीत कदम यांनी महानगरपालिकेतील सत्ता भाजपकडून  काढून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या दोनही नेत्यांनी निवडणुकीत लक्ष घालत महापालिकेमधील सत्ता काबीज करण्याच्या हालचाली केल्या. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागली. भाजपकडून मात्र सर्व 43 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता काढून महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे मनसुबे सुरू आहेत. भाजपच्या आताच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी आहे. तसेच भाजपच्या काही नगरसेवकात नाराजी आहे. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळून आम्ही उठवू आणि भाजपची सत्ता उलटवून टाकू, असं काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत.

सांगली महापालिकेत जयंत पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील, काँग्रेस नगरसेवक नाराज, तर भाजप नगरसेवक गायब!

भाजपचे 7 ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने भाजपची चिंता वाढली आहे. भाजपकडून मात्र सर्व 43 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपची सत्ता उलथवणार का? अशी चर्चा आहे. भाजपच्या नगरसेवकांत नाराजी आहे. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळून आम्ही उठवू आणि भाजपची सत्ता उलटवून टाकून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष भाजप पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे.