Suresh Dubey Murder Case: बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे (Suresh Dubey) यांची 9 ऑक्टोबर 1989 रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवर 6 ते 7 जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी सन 1992 साली टाडा (TADA) लावण्यात आला होता. त्यानंतर या प्रकराणात 17 आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, टाडा कोर्टाचा चार्ज पुण्यातील न्यायालयाकडे असल्याने भारतातील या शेवटच्या टाडा खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आहे. याप्रकरणी जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर (Bhai Vishnu Thakur), दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे.
विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात पुण्याच्या टाडा कोर्टाने जयंत उर्फ भाई ठाकूर तसेच दीपक ठाकूर, गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर सुरेश दुबे यांच्या मुलीचा पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'या निर्णयाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची' प्रतिक्रिया सुरेश दुबे यांची मुलगी नेहा दुबे यांनी दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलताना, 'आम्ही कोर्टाचा निर्णय स्विकारत आहे. माञ भाई ठाकूर कोण आहे. त्यांची दहशत काय आहे. हे सर्वांना माहित आहे.' आपल्या वडिलांचा खून भाई ठाकूर यांनीच केल्याच स्पष्ट मत नेहा दुबे यांनी यावेळी व्यक्त केलं. दुबे कुटुंब गेल्या 44 वर्षांपासून सुरेश दुबे खून खटल्याबाबत संघर्ष करत आहे. 'तसेच शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार' असल्याचं मत नेहा दुबे यांनी व्यक्त केलं.
यापूर्वी या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे , पॅट्रीक तुस्कानो , राजा जाधव आणि माणिक अनंत पाटील यांचा समावेश आहे. बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी 2004 मध्ये टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चत करण्यात आले होते. दरम्यान, आता न्यायालयाने भाई ठाकूर, दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
शेवटच्या टाडा खटल्याची सुनावणी पूर्ण
बांधकाम व्यावसायीक सुरेश दुबे यांच्या खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर, यांची पुणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. देशातील शेवटच्या टाडा खटल्यात पुणे न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आज दिला.