नवी मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 30 एप्रिल रोजी विविध अराजपत्रीत गटासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. रोहित कांबळे असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आलं आहे. 


आरोपी रोहित कांबळे हा चिकली, पुणे येथे राहणारा आहे. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता गुन्ह्यांत वापरलेला 1 डेस्कटॅाप, 1 लॅपटॅाप, 3 मोबाईल , 1 इंटरनेट राऊटर हस्तगत केले आहे. आरोपीने  गुन्हा करताना वापरलेला आयपी ॲड्रेस निष्पन्न करून त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिल रोजी झालेल्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट होती आणि ती व्हायरल झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 


MPSC Hall Ticket Viral : फक्त प्रवेशपत्र व्हायरल, विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दोन संकेतस्थळे आहेत, मुख्य संकेतस्थळ ज्यावर जाहिरात, प्रसिद्धीपत्रक, निकाल अभ्यासक्रम इत्यादी पीडीएफ स्वरूपात फाईल माहिती प्रसिद्ध केली जाते. त्यावर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा ठेवला जात नाही. दुसरे संकेत स्थळ हे ऑनलाईन अर्ज प्रणालीसाठी आहे. या संकेतस्थळावर उमेदवाराचे प्रोफाइल, विविध जाहिरातीकरता केलेले प्रवेश, प्रवेश प्रमाणपत्रे, गुणपत्रक इत्यादी वैयक्तिक तपशील उपलब्ध करून दिले जातात.


30 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेला 4,66,455 उमेदवार बसले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उमेदवारांची ओळखपत्रं जेव्हा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिल्यावर प्रवेश प्रमाणपत्रे डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडते आणि त्यामुळे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाचा सर्वर डाऊन होतो. हा आयोगाचा मागील काही परीक्षांचा अनुभव आहे. 


परिणामी परीक्षेपूर्वी अभ्यास सोडून प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचा मोठा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागतो. त्यामुळे उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करताना सर्व डाऊनचा अडथळा येऊ नये याकरिता प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याकरिता आयोगाच्या मुख्य संकेतस्थळावर एक वेगळी बाह्य लिंक उपलब्ध करून दिली जाते. त्यातून केवळ प्रवेश प्रमाणपत्र मिळवता येतील. आयोगाचे मुख्य संकेतस्थळावरील बाह्य लिंक मधील कच्च्या दुव्यांचा गैरवापर करून काही उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र मिळवली आहेत.