सिंधुदुर्ग : सुरंगी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते सुरंगीचे मनमोहक गजरे आणि सुरंगीचा मादक सुगंध. मात्र हीच सुरंगी आणि तिचा हा सुगंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 ते 15 गावांची अर्थकारण चालवते. अवघ्या 15 ते 20 दिवसांच्या काळात सुरंगी पासून 12 ते 15 कोटींच्या घरात उलाढाल आहे. सुरंगीचे कळे, फुले जवळपास 500 ते 600 कुटुंबाचा पोशिंदा आहे. जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, सुरंगीचे सुकवलेल्या कळ्या, फुले यांच्या मार्केटची व्याप्ती खूप मोठी आहे.
या सुकवलेल्या कळे आणि फुलांपासून सुहासिक अत्तरे, साबण, कलर अशा अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. यासाठी गावात व्यापारी येऊन हे सुकवलेले सुरंगीचे कळे, फुले घेऊन जातात. मात्र, या सुरंगीलाही आता बदलत्या वातावरणाचा परिणाम होतोय. अवकाळी पाऊस, कमी प्रमाणात पडलेली थंडी यामुळे यावर्षी सुरंगीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. यावर्षी सुरंगीचे कळे, फुले यामध्ये 50 ते 60 टक्क्यांनी घट झाली. याचा थेट परिणाम यावर आपलं वार्षिक गणित अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर होत आहे.
सुरंगीचे झाड हे सर्व साधारणपणे आंब्याच्या झाडासारखेच असते. 40 ते 50 फूट उंच असलेल हे सुरंगीचं झाडं 70-80 वर्षे जगत. मार्च महिन्याच्या मध्यापासून महिना अखेरपर्यंत सुरंगी बहरते. याच्या खोडालाच कळ्या येतात. परागकण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सुरंगीच्या पिवळसर पांढऱ्या फुलांचा सुगंध या गावात प्रवेश केल्यावर दरवळतो. पण सिंधुदुर्गात बहराला आलेली सगळी झाडे नैसर्गिकरीत्या उगवलेली आहेत. यात नर झाडाला बहर येत नाही. एकदा झाड बहरू लागले की किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो. मात्र, सुरंगीच्या झाडावर संशोधन होऊन त्यापासून झाडं बनवणे तसेच जिल्ह्यात सुरंगीच्या सुकवलेले कळे, फुले यावर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास युवा पिढीला रोजगार निर्मिती होऊ शकेल.
वेंगुर्ले तालुक्यातील काही गावांच अर्थकारण पूर्णतः सुरंगीवर अवलंबून आहे. आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल, रेडी, मातोंड, अनसुर, दाभोली, आरोली, शिरोडा या गावांमध्ये सुरंगीची संख्या बऱ्यापैकी आहे. या भागातील जवळपास 600 कुटुंबे सुरंगीच्या माध्यमातून आपले अर्थार्जन चालवतात. जिल्हाभर सुरंगीच्या पसरलेल्या नैसर्गिक लागवडीचे क्षेत्र साधारण 40 ते 42 हेक्टर इतके आहे.
कोलगाव, आकेरीत सुरंगीचे गजरे करण्याचा व्यवसाय चालतो. इतर गावांत मात्र सुरंगीचे कळे सुकवून ते विकले जातात. एका झाडापासून दरवर्षी साधारण 30 ते 35 किलो सुरंगी कळा मिळतो. याचा दर साधारण 300 रुपयापासून 350 रुपयांपर्यंत असतो. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे 600 कुटुंबांचा सहभाग असतो. एका कुटुंबाला यातून एका हंगामाला पन्नास हजार ते साडेपाच-सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ पंधरा दिवसांचा असतो.
प्रत्येकी सर्वसाधारण उत्पन्न दोन लाखाचे धरले तरी एकूण उलाढाल 16 कोटींची होते. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही. अवघे पंधरा-वीस दिवस काम करून त्यावर वर्षभर आरामात जगणारी कुटुंबेही या भागात आहेत.
अवघ्या पंधरा-वीस दिवसांत कोटीच्या घरात उलाढाल होत असली तरी यासाठीची मेहनत आणि जोखीम तितकीच आहे. सुरंगीचे झाड मोठे आणि पसरलेले असते. याच्या फांद्यांना कळे, फुले येतात. वेंगुर्ले तालुक्यातील सर्व गाव सुरंगीचे कळे काढतात. याच्या फांद्या कमकुवत असतात. या झाडावर चढणेही अनुभवी आणि कसब असलेल्यांनाच शक्य होते.
कळे छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणे कठीण असते. यासाठी झाडाला दोऱ्या बांधून ती काढावी लागतात. या झाडावर चढणाऱ्यांची मजुरी साधारण 600 ते 800 रुपयापर्यंत जाते. ज्यांना कळे काढणे शक्य नाही, ते झाडाभोवती शेणाचा सडा काढून किंवा प्लास्टिकचे मोठे कापड पसरून ठेवतात. पडलेली फुले गोळा करून ती सुकवली जातात.