Supriya Sule In Pune : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (PuneNews) स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दीड ते दोन लाख रोजगार घालवले. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठं काही तरी आपण आणू मात्र मी त्यांना म्हणते की तुम्ही राजीनामा द्या आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करा आम्ही तुम्हाला मोठं काही तरी देऊ, असं बोलण्याला काही अर्थ आहे का?, अशी टीका वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्टबाबत खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्या पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये बोलत होत्या.
वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे पुणे जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे दीड लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. महाराष्ट्राच्या तरुणांचा तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप राज्य सरकारने केलं आहे. काही हिताचं आणि चांगलं काम केलं तर यांनी केलं आणि वाईट केलं तर मविआ सरकारने केलं, अशी यांची कायम भूमीका असते, असाही हल्लाबोल त्यांनी केला. आम्ही हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटावं. आम्हीही यासाठी मदत करु, असंही त्या म्हणाल्या.
जिल्ह्याला पालकमंत्री नाही
जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामं रखडली आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना स्थानिक कामं करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे. डीपीडिसी 800 कोटी थांबवले आहेत. लोकांच्या हक्काचे पैसे का थांबवले आहेत? हे पाप मी कधीच केलं नसत. सर्व सामान्याच्या हिताची कामे रखडली आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नियुक्ती तातडीने करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अर्थमंत्र्यांचं बारामतीत स्वागत
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीचा दौरा करण्यार आहेत. त्यांचं बारामतीत आम्ही स्वागत करतो. त्या बारामतीत मुक्कामही करणार आहे. त्यामुळे शहराची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आम्ही सहकार्य करु शिवाय पवारांच्या घरात देखील त्याचं चांगल्या पद्धतीने स्वागत करु, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रताप सरनाईकांना इडी दिलासा... यात आश्चर्य काय?
प्रताप सरनाईक इडीने दिलासा दिला मात्र यात मला काही आश्चर्य वाटत नाही. ही बाब मी आधीच काही लोकांकडे बोलले होते. भाजप मध्ये गेलो तर आपल्याला इडीचा त्रास होत नाही असं भाजपचेच लोक बोलत आहेत. भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे. भाजपात गेलं तर इडीची चौकशी होत नाही आणि झाली तरी दिलासा मिळते, अशी टीका देखील त्यांनी विरोधकावर केली आहे.