Ambabai Mandir : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर तोंडावर आलेल्या नवरात्रौत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरु आहे. अंबाबाई मंदिरातील पितळी उंबऱ्यावरील दरवाजा आणि गर्भगृहाचा दरवाजा नवीन बसवले जाणार आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये नवीन दरवाजे तयार करून बसवले जातील. यासाठी कारागीरांची युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. टेंबलाईवाडी येथील पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यालयात दरवाजे तयार करण्याचे काम सुरु आहे. 


विशेष म्हणजे या दरवाज्यांना चांदीची झळाळी असेल. रवाजे तयार करण्यासाठी सागवानचे लाकूड कर्नाटकातून आणण्यात आलं आहे. चांदीचा मुलामा देण्यासाठी चांदीही जमा झाली आहे. सागवान लाकडापासून दरवाजा तयार झाल्यानंतर चांदीचा मुलामा चढवला जाईल. दरवाजा करण्यासाठी कोकणातून कारागीर आणण्यात आले आहेत.  



अंबाबाई मंदिरात स्वच्छता सुरु 


दरम्यान, अंबाबाई मंदिरात नवरात्रीसाठी काही दिवस राहिल्याने स्वच्छतेला वेग आला आहे. यासाठी मुंबईहून एक टीम दाखल झाली आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये अंबाबाई मंदिराची मुंबईस्थित संजय मेंटेनन्स कंपनीकडून विना मोबदला स्वच्छता करून दिली जाते. त्यांनी कालपासून आपल्या कामाला प्रारंभ केला आहे. 


अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पेड ई पासची सुविधा


दुसरीकडे नवरात्रौत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही, अशा भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे.  


पासची किंमत माणसी 200 असणार 


पेड ई पासची किंमत माणसी 200 रुपये असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे.  मंदिरात प्रवेश केल्यानंतर तत्काळ बुकिंग करून पास मिळणार आहे. दरम्यान, यंदाचा अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय होणार आहे. 


मंदिरात दर्शनाला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता


कोरोना संकट मागे सरल्याने राज्यात उत्सवांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव राज्यात कोणत्याही निर्बंधाविना पार पडला. त्यामुळे यंदा नवरात्रौत्सवही मोठ्या उत्साहात पार पडणार यात शंका नाही. अंबाबाईच्या दर्शनाला यावर्षी विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. सरासरी 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, यावेळी हा आकडा मोडीत निघण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या