मुंबई : राज्य सरकारतर्फे शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


महायुती सरकारच्या काळात ही पोर्टल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, दौऱ्यांच्यानिमित्ताने राज्यभरात फिरताना अनेक विद्यार्थ्यांनी महापोर्टलविषयी आपल्याकडे तक्रार केली होती. राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन झाले होते. त्यावेळी अनेक युवकांनी आपल्याला भेटून महापोर्टल बंद करण्याची मागणी केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


दिव्यांगाच्या 2016 सालच्या कायद्यामुळे 21 प्रकारच्या दिव्यांग प्रकारांना सामावून घेण्यात आलं आहे. त्यामुळे दिव्यांगांबाबतच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. यामुळेच इतर काही राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे, याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली. दिव्यांगाच्या व महापोर्टल सेवा बंद करावी या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वेळ मागितली होती. त्यानुसार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांनी दिले पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत

भूमीपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार; राज्यपालांचे आश्वासन

मी पुन्हा येईन म्हणाले, पण कुठे बसणार ते सांगितलं नव्हतं; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Mahaportal | नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, वाढती फी, वेळकाढू प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची मागणी | ABP Majha