मुंबई : मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन झालं आहे. काल (30 नोव्हेंबर) विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यभ नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.


आपल्या भाषणात बोलताना जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्ष चांगले काम केले. याआधी त्यांनी प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम केलं आहे. त्याचा फायदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवताना झाला. आमच्या काळात आम्ही प्रसिद्धीसाठी निधी ठेवला होता. परंतु आमच्या बाबांनी सांगितले इतका पैसा प्रसिद्धीवर खर्च करायचा नसतो, असं सांगत पाटलांनी फडणवीसांना चिमटा काढला. तसेच भाजपने प्रसिद्धीवर केलेल्या अमाप खर्चावर बोट ठेवले.

पाटील म्हणाले की, फडणवीसांनी मी पुन्हा येईन असे सांगितले होते, परंतु कुठे बसेन ते सांगितलं नव्हतं. आता पुढची पाच वर्ष त्यांनी इकडे येण्याचा प्रयत्न करु नये. फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे. 2014 मध्ये भाजप आमदारांमधून तुमची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. यावेळीदेखील भाजप आमदारांपैकी विखे पाटील यांना वगळून तुमची निवड करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील हे आमचेच आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात अंतर नाही. त्यांना आम्ही ओढून आणू, असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.

जयंत पाटलांची अधिवेशनातील टोलेबाजी पाहा