मुंबई : मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन झालं आहे. कालपासून (30 नोव्हेंबर) विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेमध्ये अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठी भाषेत होते. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी आश्वासनं दिली. तत्पूर्वी राज्यपाल विधीमंडळात दाखल झाले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे स्वागत केले.

अभिभाषणात राज्यपाल म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करण्यासाठी राज्यशासन वचनबद्ध आहे. त्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. तसेच येथील भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही कायदा आणणार आहोत.

राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी शेतकऱ्यांचेही मुद्दे मांडले. राज्यपाल म्हणाले की, राज्याने नुकत्याच दोन मोठ्या आपत्तींचा सामना केला आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे भरुन न निघाणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील.

राज्यपाल म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच तरुणी आणि महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शासनाकडून मुलींसाठी वसतीगृहं बाधून दिली जातील.