कल्याण : राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली आहे. अशा परिस्थितीत आता कल्याण डोंबिवली महापालिकेतही या दोन पक्षांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. याला कारण ठरलंय ते महापौर आणि स्थायी समितीचं सभापतीपद.


2015 साली झालेली कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना भाजपने वेगवेगळी लढवली. याच निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाघाचे दात मोजण्यापर्यंत शाब्दिक वाद रंगला. मात्र निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक जास्त असल्याने चार वर्ष महापौरपद शिवसेनेला, तर शेवटच्या वर्षी भाजपला द्यायचं ठरलं होतं. तसेच स्थायी समितीचे सभापतीपद दोन-दोन वर्ष वाटून घ्यायचा फॉर्म्युला ठरला होता.

आता पाचव्या वर्षी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भाजपने या पदावर दावा केला आहे. शिवसेनेनं चार वर्ष महापौरपद घेतलं, त्यामुळे आम्हाला स्थायी समिती सभापतीपद एक वर्ष जास्त द्यावं, अशी भाजपची मागणी आहे. तसेच आता शेवटचे वर्ष बाकी असल्याने महापौरपदासाठीही भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र राज्यातले सध्याचे वातावरण पाहता शिवसेना ही दोन्ही पदं भाजपला द्यायला अनुकूल नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीतही या दोन पक्षांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.