मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आगामी निवडणुकांना एकत्र सामोरी जाणार असली, तरी काही जागांवरुन दोघांमध्ये ओढाताण सुरु असल्याचं म्हटलं जातं. एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दिली जाणार का, याविषयी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन युवा चेहरे एकत्र पाहायला मिळाले.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी अहमदनगरची जागा सोडणार का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. आधीच, विखे पाटील आणि पवार कुटुंबाचं राजकीय वैर जगजाहीर असताना त्यांच्या तिसऱ्या पिढीकडून मात्र मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी प्रवरामधील विखे पाटील सहकारी कारखान्याला भेट दिली. यावेळी सुजय आणि रोहित एकत्र दिसले.

राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध अजित पवार हे चित्र महाराष्ट्राने बघितलं आहे. विरोधी पक्षात आल्यावर मात्र विखे पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये संवाद सुरु झाला. आता तिसऱ्या पिढीतील सुजय विखे पाटील आणि रोहित पवार एकत्र हे तरुण नेते दोन कुटुंबांतील मैत्रीचा नवीन अध्याय लिहिणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत.