हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथे विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेवर बलात्कार झाल्याचं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. आरोपी ब्लॅकमेल करत असल्याचं महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. गरोदरपणातही आरोपींनी आपल्यावर बलात्कार केल्याचं महिलेने लिहून ठेवलं आहे.
याप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर महिलेच्या हातात सुसाईड नोट सापडल्याने तिच्या पतीच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभान गणपत कायंदे, परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे अशी आरोपीची नावं आहेत. तिन्ही आरोपींविरोधात कलम 376 (2)(एच), कलम 376 (डी), कलम 306, कलम 506, कलम 452, कलम 34 आणि सह कलम 66 (ई) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 22 डिसेंबर 2015 मध्ये महिलेच्या घरात जबरस्तीने घुसले होते. त्यानंतर घरात घुसून त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. ज्यावेळी तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. या बलात्काराचा आरोपींनी व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ गावात दाखवून आरोपी महिलेची बदनामी करत होते. या त्रासाला कंटाळूनच आणि आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचं महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं.
तिन्ही आरोपींची चौकशी करुन त्यांना शिक्षा द्यावी. मरताना व्यक्ती खरं बोलतो, तसं मीही खरं बोलत आहे. मी माझ्या मनानेच फाशी घेत असून त्या तिघांना सजा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. या शिक्षेमुळे पुन्हा गावात कुणी गैरकृत्य करणार नाही, असं आत्महत्येपूर्वी महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होत. पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून आरोपींचा शोध सुरु आहे.
संबंधित बातम्या
- हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप
- पुण्यात अॅसिड फेकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार