परळी तालुक्यातील एक कुटुंब सध्या अंबाजोगाई वास्तव्यास आहे. 2012 साली या कुटुंबातील दहा वर्षीय मुलगी सुटीनिमित्त गावाकडे गेली होती. त्यावेळी तिच्या नात्यातील भगवान अप्पासाहेब दळवे (तत्कालीन वय 32 ) याने अल्पवयीन मुलीच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत पिडीतेला थंड पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरच्या वर्षांच्याही सुट्यात भगवानने कधी चॉकलेट तर कधी पाण्यातून पिडीतेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी भगवानने दिल्याने पिडीतेने या अत्याचाराची कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे हिम्मत वाढलेला भगवान 2016 साली डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थेट अंबाजोगाई शहरात पिडीतेच्या शाळेत गेला आणि वडील आल्याचे कारण सांगून तिला बाहेर घेऊन आला. त्यानंतर त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. योगेश्वरी देवी मंदिर, मुकुंदराज आदी ठिकाणी फिरवून नंतर लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर पिडीतेचे पोट दुखू लागल्याने तिला आजीने स्वाराती रुग्णालयात नेले. तपासणी दरम्यान डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पिडीतेला विचारणा केली असता तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी भगवान दळवे याच्यावर सिरसाळा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Hinganghat Woman Ablaze | हिंगणघाट निर्भया प्रकरण : पीडितेच्या मृत्यूनंतर परिचारिकांची प्रतिक्रिया
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तत्कालीन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणी न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासल्यानंतर अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी भगवान दळवे याला दोषी ठरविले. त्याला कलम 376 (2) नुसार सश्रम जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड, कलम 328 नुसार 10 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड, कलम 506 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोक्सो कायद्यानुसारही आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे परंतु त्यापेक्षा जास्त असलेली जन्मठेपेची शिक्षा आरोपीला सुनावण्यात आलेली असल्यामुळे वेगळी शिक्षा देण्याची गरज नाही असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी काम पहिले.
संबंधित बातम्या :
हिंगणघाटच्या लेकीचा संघर्ष थांबला, पीडीत तरूणीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
सुमीत वाघमारे हत्या : पत्नी भाग्यश्री आणि कुटुंबाला जामीनावर असलेल्या आरोपींकडून धमकी