मुंबई: जगदंबा तलवार पाठोपाठ आता शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच शिवराज्याभिषेक दिनाला 2024 साली 350 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 6 जून 2024 हा संकल्प आणि शपथ दिवस असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.  


शिवरायांनी वापरलेले वाघ नखं पुन्हा मिळावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघ नखं राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये आहेत. या आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 




सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अमृत महोत्सवी वर्षात काही कार्यक्रम करावे हा हेतू आहे. 


अमृत महोत्सवी वर्षात राज्यात काय सुरू होणार? 



  • 54 कोटी खर्च करून यशदामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी एक सभागृह करण्याचा निर्णय झाला. 

  • आर्थिक स्वातंत्र महिलांपर्यत पोहोचावं यासाठी एसएनडीटी उपकेंद्राला मान्यता दिली असून त्यासाठी 55 कोटी जाहीर करण्यात आले आहेत.

  • दिव्यागांबाबत एक विशेष कार्यक्रम करण्याचा निर्णय झाला आहे. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. 

  • ग्रामीण भागात ग्रामविकासाच्या माध्यमातून कामे होतात, यासाठी नागपूरमध्ये एक केंद्र सुरू होत आहे. यासाठी 100 कोटी खर्च केला जाणार आहेत. 

  • रवींद्र नाट्य मंदिर याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण करण्यात येणार आहे.

  • दर्शनिका विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याची दर्शनिका करावी यासाठी आठ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • आज हिंदी, सिंधी, गुजराती भाषेसोबत तेलगु आणि बंगाली लोक इथे आले आहेत, त्यासाठी बंगाली आणि तेलगुसाठी दोन साहित्य अकादमी सुरू करण्यात येणार आहे.

  • प्रत्येक जिल्ह्यात अमृत महोत्सव शूरतेचा वारसा यासाठी कार्यक्रम केला जाणार आहे.

  • शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 6 जून 2024 ला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी पुढील वर्षभर राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. 6 जून 2024 हा संकल्प आणि शपथ दिवस असणार आहे.

  • गुजरातमधीव सरदार वल्लभभाई पटेल संग्रहालयाच्या धर्तीवर राज्यात 30 एकरमध्ये संग्रहालय करण्याचा निर्णय झाला आहे. जर बीपीटीने 30 एकर जागा दिली तर हे संग्रहालय मुंबईत होऊ शकेल.